29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजSharad Pawar : चर्चेत राहणारा ‘जाणता राजा’

Sharad Pawar : चर्चेत राहणारा ‘जाणता राजा’

ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८०वा (१२ डिसेंबर) वाढदिवस…

  • अभिषेक सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जातात. या वयातही साहेबांची जिद्द, ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे मन तरूण आहे. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित आहे. देशभरात आजही लोक म्हणतात की, देशाला दिशा देणारा एक नेता महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे शरद पवार… पवार हे एकमेव व्यक्ती आहेत जे सर्वांना एका छताखाली आणू शकतात. पवार साहेब यांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच त्यांचा गौरव केला. ‘पवार इतने आगे है क्यूंकी, उनके साथ प्रतिभा आहे’ असे ते नेहमी म्हणायचे. पवार हे सर्वार्थाने लोकनेते आहेत. अशा या आपल्या नेत्याने शतायुषी व्हावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा..!!

Sharad Pawar : चर्चेत राहणारा ‘जाणता राजा’

शरद पवार यांचे नेतृत्व कमालीचे गूढ आणि अगम्य आहे. शरद पवारांचे डावपेच कळण्यापलीकडचे असतात, याबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांची ठाम खात्री असते. कोणाला कधी डोक्यावर घ्यायचे, कोणाला कधी खांद्यावर घ्यायचे आणि कोणाला कधी गुडघे टेकायला लावायचे हे पवारांना बरोबर समजते. आजकाल हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत चरित्रपट काढायची लाट आलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षात महेंद्रसिंग धोनीपासून ते सचिन तेंडुलकपर्यंत, अण्णा हजारेंपासून संजय दत्तपर्यंत अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट येऊ लागले आहेत. त्या चित्रपटाच्या नावातही इंग्रजी टॅग असते. महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी.. वगैरे वगैरे. त्यामुळे राजकारणातील दिग्गज असलेल्या शरद पवारांवर जर असा चित्रपट बनवायचा झाला, तर त्याला नाव मात्र ‘पवार- द गेम चेंजर’ असे काहीसे असेल असे वाटते. कारण ऐनवेळी खेळ खल्लास करायचा किंवा त्याचा मार्ग बदलायचा आणि कुणाचे कसे उट्टे काढायचे हे सगळे खेळ शरद पवारांइतके कोणालाच ठाऊक नसतील.

मंगेश पाडगांवकरांची एक कविता आहे, ‘एक जिप्सी आहे माझ्या मनात दडून..’ ही जिप्सी म्हणजे समुद्रकिनारी वाळूमध्ये घर उभे करण्यात रमलेली मुले. आई-वडील किंवा बरोबर आलेली मोठी माणसं गप्पात गुंतलेली असताना ही मुलं हा खेळ खेळत किल्ला घर तयार करतात. सुंदर कलाकृती निर्माण होत असतानाच आई-वडील म्हणतात, चला अंधार पडू लागला जाऊया आता.. मग ते उभारलेले वाळूचे शिल्प, घर, किल्ला ती मुलं लाथेने उधळून लावतात आणि नष्ट करतात. आपल्या हातानेच उभारायचे आणि आपल्या हातानेच संपवायचे या वृत्तीलाच कदाचित जिप्सी म्हणत असावेत. अशी ‘जिप्सी’ शरद पवारांमध्ये चांगलीच दडलेली दिसून येते. त्यामुळे कोणता गेम केव्हा ते चेंज करतील हे सांगता येत नाही.

शरद पवारांना खरं तर या पंतप्रधानपदाने वेळोवेळी हुलकावणी दिलेली आहे. १९९१ च्या राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमधून जी पहिल्या फळीतील नेतेमंडळी पंतप्रधानपदाचे दावेदार होते त्यात पी. व्ही. नरसिंह राव यांच्याबरोबरच प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि माधवराव शिंदे (सिंधिया) यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत होती. नरसिंह रावांचा नंबर लागला. पण त्या काळात घोटाळे आणि दुर्घटना इतक्या झाल्या की पुढची निवडणूक जिंकणे काँग्रेसला शक्यच नव्हते. १९९६ ची निवडणूक काँग्रेस हरल्यावर वाजपेयींचे आणि नंतर देवेगौडांचे सरकार आले. तेव्हा पवारांचे महत्त्व चांगलेच वाढले होते. भाजपचे प्रमुख विरोधक म्हणून शरद पवारांचे नाव झाले आणि नंतर १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ते लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही झाले. त्यामुळे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ते होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी ‘सोनिया लाओ देश बचाओ..’ अशी हाक दिली. देश काही धोक्यात नव्हता, पण काँग्रेस वाचवायची होती. सोनिया गांधींना पक्षाच्या अध्यक्षा करण्यापेक्षा त्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरच्या भूमिकेत राहून पक्षासाठी मॉडेलिंग करतील आणि त्याचा फायदा सहानुभूती निर्माण करून काँग्रेसच्या जागा वाढण्यात होईल असा होरा पवारांचा त्यावेळी होता. परंतु काँग्रेसमधील गांधीनिष्ठ काही नेत्यांनी सोनिया गांधींना पक्षाध्यक्षच केले आणि पंतप्रधानपदाच्या दावेदारही केल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी असताना, वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळवण्याची ताकद असलेल्या शरद पवारांनी आपला पंतप्रधानपदाचा मार्ग सोनिया गांधींमुळे रोखला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचा तुकडा पाडून राष्ट्रवादीची निर्मिती केली. त्यांच्यातील जिप्सी जागृत झाली आणि हा उभारलेला किल्ला मोडला. १९९९ च्या निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआ सत्तेत आली. वाजपेयी पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या झाल्या. पवारांची अवस्था अवघड झाली. पंतप्रधानपद नाही, विरोधी पक्ष नेतेपदही गेले. हा या गेम चेंजर हिरोच्या जीवनातील फार मोठा धक्का होता. म्हणजे, २००४ ला जेव्हा भाजप सत्तेतून गेली आणि काँग्रेसची आघाडी झाली तेव्हा सोनिया गांधींच्या पंतपप्रधानपदाचा तांत्रिक मुद्दा निर्माण झाल्यावर डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली. यावरून ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईमिनिस्टर’ नावाचा अनुपम खेर यांनी भूमिका केलेला चित्रपटही येत आहे. त्यावेळी जर शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर कदाचित शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली असती. मनमोहन सिंगांऐवजी आज बोहरा ब्रदर्सनी शरद पवारांवर ‘द स्ट्रगलर प्राईममिनिस्टर’ नावाचा चित्रपट बनवला असता. २१ डिसेंबर २०१८ ऐवजी तो १२ डिसेंबरला रिलीज झाला असता. पण मनात जिप्सी दडलेल्या या गेमचेंजर हिरोला इथे फार मोठा धक्का बसला.

शरद पवारांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात कृषी खात्याची जबाबदारी सांभाळून आपली प्रतिमा देशव्यापी ठेवली. शेतक-यांचे नेते अशी प्रतिमा निर्माण केली. या दहा वर्षात विशेषत: यूपीए-२ च्या काळात काँग्रेस जास्तीत जास्त बदनाम झाली तरी शरद पवारांवर कसलाही शिंतोडा उडाला नाही ही प्रतिमा त्यांनी निर्माण केली. साहजिकच त्याचा फायदा आत्ताच्या आघाडीसाठी पवार उठवत आहेत. हे कसे करायचे, केव्हा काय पावले टाकायची हे शरद पवारांना चांगले जमते.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला वेगळेच राजकारण शिकवले. शरद पवार यांनीही तो वारसा पुढे चालवला; पण म्हणून समोर दिसेल त्याला पवार येतोस राष्ट्रवादीत, मग बैस घोडयावर असे म्हणत प्रत्येकालाच राष्ट्रवादीत सहभागी करून घेतले, असेही झाले नाही. बाहेरून आपल्या पक्षात कोणी येत असेल तर त्यांची ना नसते; पण त्यासाठी नको ते आरोप आपल्या माथी घेण्यास ते तयारही नसतात. गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचे पुत्र धनंजय भाजप सोडून राष्ट्रवादीत यायला निघाले तेव्हा पक्षातील इतरांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली; पण पवार यांनी मात्र गोपीनाथ मुंडे हे चांगले गृहस्थ आहेत, त्यांचे नेतृत्वही सक्षम आहे. त्यामुळे तुम्ही गोपीनाथरावांच्या बरोबरच भाजपमध्ये काम करा, असा सल्ला पवारांनी पंडित मुंडे व धनंजय यांना दिला होता; पण तेच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळेच त्यांना पक्षात घेण्यात आले. धक्कादायक विधाने करण्यास निष्णात नेता अशी पवारांची आणखी एक ओळख आहे.

पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते, ते कळतही नाही. अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात.

माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे. अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिल, मुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील त्यांची मैत्रीही प्रसिद्ध आहे. पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी