28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeटॉप न्यूजUnlock 1.0 : देश अनलॉक होतोय, आता अधिक सावध राहण्याची गरज

Unlock 1.0 : देश अनलॉक होतोय, आता अधिक सावध राहण्याची गरज

टीम लय भारी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ (Mann ki baat ) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. देशाने कोरोनाविरोधात एकजुटीने लढा दिला आहे. आता अनलॉकच्या (Unlock 1.0) माध्यमातून काही नियम शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.

कोरोना संकट ते योग दिन (Unlock 1.0)

देशासमोर उभ्या असलेल्या कोरोना संकटापासून ते योग दिनापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. १ जूनपासून देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा समाप्त होऊन पाचवा टप्पा सुरू न होता अनलॉक-१ (Unlock 1.0) सुरू होत आहे. हा नवा टप्पा ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच मोदी सरकारच्या दुस-या पर्वाची काल वर्षपूर्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मन की बात द्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. मोदी यांचा हा ६५ वा ‘मन की बात’ कार्यक्रम आहे.

आता अधिक सावध राहण्याची गरज (Unlock 1.0)

तब्बल सव्वादोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे आता फिरू लागली असून, नागरिकांवरील बंधने आता हळूहळू कमी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता अनलॉक-१ च्या (Unlock 1.0) काळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे (Unlock 1.0)

यावेळी मोदीनी सांगितले की, मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. सर्व खबरदारी घेऊन रेल्वे आणि विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. देश कोरोनाविरोधातील लढा गांभीर्याने लढत आहे. त्यामुळे त्याविषयीची जाणीव पुढील काळातही ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आता अनलॉक-१ च्या (Unlock 1.0) काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर, सतत हात धुणे, स्वच्छता पाळणे आणि तोंडावर मास्क परिधान करणे गरजेचे आहे. आपल्या स्वत:साठी आणि देशासाठी आपण हे करूया, असे आवाहन मोदी यांनी केले.

कोरोना लढाईत देशवासीयांच्या संकल्पशक्तीसोबतच सेवाशक्ती उपयुक्त ठरली (Unlock 1.0)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, देशातील सामुहिक शक्तीमुळे देशात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र आपल्याकडे कोरोना पसरलेला नाही. तसेच मृत्यूदरही मर्यादित राहिला आहे. नुकसान झाले त्याचे दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे, कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांच्या संकल्पशक्तीसोबतच सेवाशक्ती उपयुक्त ठरली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका देशातील गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यामुळे देशातील पूर्व भारतात यामुळे निर्माण झालेली दु:खद परिस्थिती तुम्ही पाहू शकता. त्यामुळे या भागात विकासकामांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यासाठी आता अनलॉक-१ च्या (Unlock 1.0) काळात काम सुरू झाले आहे.

आत्मनिर्भर भारत अभियान देशाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल (Unlock 1.0)

काही ठिकाणी श्रमिकांच्या स्कील मॅपिंगचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी स्टार्टअप कामात गुंतले आहेत. तर कुठे मायग्रेशन कमीशन बनवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान या दशकामध्ये देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे, असे मत मोदींनी यावेळी मांडले.

भारताने योग जगभरात पोहोचवला (Unlock 1.0)

जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारताने जगभरात योग पोहोचवला. आयुष मंत्रालयाने एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचे आहे. भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोक या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत, असे मोदी म्हणाले.

प्रत्येक ठिकाणी लोक योग आणि त्याबरोबरच आयुर्वेदाशी जोडले जात आहेत. ज्या लोकांनी कधीही योग केलेला नाही, असे लोकही ऑनलाइन योग क्लास सुरू करत आहेत, असे ते म्हणाले.

कोरोनाविरोधातील लढ्यातील योद्धांचे केले कौतुक (Unlock 1.0)

पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात अम्फान महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचाही उल्लेख केला. तसेच कोरोनाविरोधातील लढ्यात अनेक जणांनी स्वतःला वाहून घेतले आहे, त्यांचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका शेतक-याने गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ट्रॅक्टरने सॅनिटायझर फवारणी करत असल्याचे सांगितले. अन्य काही गौरवास्पद उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली.

जल है तो जीवन है

आपण ‘जल है तो जीवन है, जल है तो कल है’, असे नेहमी म्हणत असतो. आपण सर्वांनी पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवायला हवा. तापमान वाढत असून, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, असे आवाहन, मोदी यांनी यावेळी केले.

‘आयुषमान भारत’ चे श्रेय देशातील प्रामाणिक करदात्यांचे

‘आयुषमान भारत’ योजनेतून अनेक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांनी उपचार घेतले. देशात अनेकांना या योजनेचा फायदा झाला आहे. याच श्रेय देशातील प्रामाणिक करदात्यांचेही आहे. त्यांनी कर दिल्यामुळे गरिबांना उपचार घेता येत आहे.

मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीने भरपूर काम झाले आहे. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. घरी परतणा-या मजुरांना काम मिळावे म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे. रेल्वेचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाही श्रमिकांना घरी सोडत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

सोशल मीडियावर अनेक दृश्य पाहत आहे. दुकानदारही खबरदारी घेत आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळले जावे म्हणून अनेक युक्त्या लढवल्या जात आहेत. भारतात कोरोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही. वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणा-यांची नाव घेऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी