28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील चाकरमानी शिमग्यासाठी गावी जाताय? मग 'हे' नियम वाचा

मुंबईतील चाकरमानी शिमग्यासाठी गावी जाताय? मग ‘हे’ नियम वाचा

टीम लय भारी

मुंबई :- मार्च महिना सुरू झाला की, मुंबईतील चाकरमान्यांना ओढ लागते ती गावच्या शिमग्याची. शिमगा म्हटला की, कोकणी माणसाच्या अंगात संचारते, शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचू लागते, बोंबा कानात घुमतात. त्यामुळे  यंदाच्या शिमगोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी शिमग्यासाठी नियमावली आणि काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सव व होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि ठोस उपाय योजना करण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणारे शिमगोत्सव व होळी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी आज जारी केले आहेत

त्यासाठी ठळक १४ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक जवळच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड चाचणी करणे बंधनकारक केली आहे. गाव होळ्या, देव होळ्या, राखण होळया उभ्या करताना ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ही या आदेशात नमूद केला आहे. सर्व मंदिर विश्वस्त व पालखी धारक यांनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करणे बंधन कारक आहे.

होळीची पालखी पूजा करताना नवस करतेवेळी पेढे, नारळ, हार इत्यादी स्वरूपातील वस्तू स्वीकारु नयेत तसेच प्रसादाचे वाटप करू नये, असे आदेश ही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, होळीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी करु नये. तसेच, तीन तीन तासाने वेळ ठरवून कार्यक्रम करावेत मात्र केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम व्हावेत, असे ही या आदेशात म्हटले आहे. पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये. शबय मागणे, गाव खेळे व नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम टाळावेत. धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळणे टाळावे, असे ही म्हटले आहे.

मुंबईतील चाकरमान्यांसाठी सूचना

मुंबई पुणे येथील ग्रामस्थांनी व चाकरमान्यांनी गावी येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, प्रतिबंधक क्षेत्रातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यास ७२ तासातील आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे बंधनकारक आहे तर, प्रतिबंधक क्षेत्राबाहेरील लोकांना spo-2 टेस्टिंग व थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक आहे. ग्राम नियंत्रण समिती यांनी ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे या नियमावलीत म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी