25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक

आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक

सत्तार शेख | लयभारी न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : एरवी लोकप्रतिनिधींकडून आढावा बैठक घेतली जाणार म्हटले की, कार्यकर्त्यांकडून वाचला जाणारा तक्रारींचा पाढा, कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांवर होणारी अरेरावी, त्यावर लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांची काढली जाणारी खरडपट्टी हा शिरस्ता ठरलेला असतो. मात्र, अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी त्यांच्याशी सुसंवाद साधून मतदारसंघाच्या विकासासाठी मंथन घडविले पाहीजे याचा आदर्श वस्तुपाठ तरूण आमदार रोहित पवार यांनी घालून दिला आहे. तब्बल 10 तास त्यांनी मतदारसंघातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली, व त्यातून मतदारसंघाच्या विकासाचा आलेख तयार केला.

आमदार पवार यांनी गुरूवारी जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात पंचायत समिती, तहसील, नगरपरिषद, कृषी, आरोग्य, शिक्षण, महावितरण, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, वन इत्यादी विविध विभागांतील अधिकारी – कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाला ठरावीक वेळ दिली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही आढावा बैठक रात्री आठ वाजेपर्यंत चालली. आढावा बैठकीतून आमदार रोहित पवारांनी जामखेड तालुक्यातील सद्यस्थिती बारकाईने समजून घेतली. तालुक्यापुढील महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कृती कार्यक्रमाची आखणी या बैठकीतून निश्चित करण्यात आली.

आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक

या बैठकीत जामखेड तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे केलेले पंचनामे, पीकविमा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधील प्रलंबित कामे, पंतप्रधान ग्राम सडक योजना, नगरपालिकेची प्रलंबित पेयजल योजना, महावितरण आपल्या दारी, उच्च दाब जोडणी योजना, किसान सन्मान योजना, महाराजस्व अभियान, बस डेपो मधील प्रश्न, ग्रामीण रुग्णालय मधील प्रश्न, पेन्शन योजना, घरकुल, तांडा वस्ती सुधार योजना, तालुका क्रीडा संकुल, टंचाई आराखडा अशा वैयक्तीक व सामूहिक योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.

येत्या काळात महसूल मंडलनिहाय महाराजस्व अभियान राबवले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी ‘जनता संवाद योजना’ सुद्धा राबवण्यात येणार आहे. यांमुळे अधिकारी वर्ग व सर्वसामान्य जनता यांमधील दरी कमी होऊन एकमेकांशी थेट संवाद प्रस्थापित करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ‘लय भारी न्यूज नेटवर्क’शी बोलताना व्यक्त केली.

आढावा बैठकीचा उद्देश तालुक्याची सध्याची परिस्थिती समजून घेणे, अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधणे, त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे, केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक व वैयक्तिक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे, पुढील ५ वर्षांत रिक्त पदे, अपुरा निधी, प्रलंबित योजना आदी प्रश्न एकत्रितपणे सोडविणे हा होता.
– रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. निवडणूक काळात आमदार रोहित पवारांनी नवनवीन पॅटर्नचा जन्म घातला. आता पवार प्रशासनाशी संवाद साधताना कुठला नवा पॅटर्न जन्माला घालणार याची उत्सुकता जामखेडकरांना होतीच. त्यानुसार रोहित पवारांनी जामखेड तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला ठराविक वेळ देऊन सविस्तर संवाद साधत आढावा बैठक घेतली. बैठकीत पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्यांना न थांबवता थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीच्या अगोदर अधिकारी तणावात होते. परंतु बैठक संपवून बाहेर पडताच अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसला. आमदार पवार यांनी आढावा बैठकीचाही नवा पॅटर्न सुरू केल्याची चर्चा नंतर चांगलीच रंगली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी