30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूज‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शरद पवार हे लोकनेते आहेत. महाराष्ट्राचे व देशाचेही नेते आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. पण त्यांचाच पक्ष फोडण्याचे काम भाजप करीत आहे. अजित पवारांना फोडण्याचा भाजपचा शेवटचा डाव होता. पण तो आता त्यांच्यावर उलटला आहे, अशी जहरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपने अन्य पक्षांच्या आमदारांना गळाला लावले होते. पण ते सगळे निवडणुकीत पडले. अजितदादांना फोडणे हा शेवटचा डाव भाजपवर उलटला आहे. अजितदादांबरोबर २५ आमदार तरी जातील असे त्यांना वाटले होते. मात्र अजित पवारांबरोबर ४ – ५ आमदार आहेत. त्यातील काहीजण परत येण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या ४ – ५ आमदारांच्या बळावर भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री केले. या वयात शरद पवारांच्या पाठीत अजित पवारांनी खंजीर खुपसला असल्याचेही राऊत म्हणाले.

भाजपकडे बहुमताचा आकडा आहे, तर काळोखात शपथ का घेतली. २०१४ मध्ये वानखेडे स्टेडीयममध्ये शपथ घेतली होती. तशी शपथ आता का नाही घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने शपथ घेतली, पण ही शपथ घेताना महाराष्ट्राच्या जनतेलाच ठाऊक नव्हते. भाजप खोटे बोलते. पण हा त्यांचा शेवटचा खोटेपणा आहे, हे विधानसभेत सिद्ध होईल. भाजपच्या नेत्यांनी मला काहीही धमक्या द्याव्यात. मी त्यांना घाबरत नाही, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले.

आमदार फोडाफोडीसाठी, विक्रीसाठी राज्यपालांनी भाजपला वेळ दिला

भाजपकडे बहुमत होते, तर ३० तारखेपर्यंत का थांबलात. राज्यपालांच्या नावात भगवान आहे. मी त्यांना भगवानाचा अवतार समजतो. पण त्यांनी आम्हाला एक न्याय, व त्यांच्या पक्षाला दुसरा न्याय दिला. आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी व त्यांना विकत घेण्यासाठी राज्यपालांनी भाजपला संधी दिली. भाजपचे हे कारस्थान आणीबाणीपेक्षा वाईट आहे. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला त्यांच्याच पक्षाचे नेते तडे देत आहेत. राज्यपालांनी आम्हाला बोलावावे. १० मिनिटांत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू शकतो. हे त्यांनाही माहित आहे. आमच्याकडे १६५ आमदारांचे संख्याबळ आहे. अगोदर १७० होते, पण पाच आमदार अजित पवारांबरोबर गेल्याचे राऊत म्हणाले.

भाजप राजकारणातील व्यापारी

भाजपला राजकारणातला व्यापार कळतो, असे मला वाटले होते. पण यांत ते चुकले. व्यापार सचोटीने प्रामाणिकपणे केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली नसती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सगळे आमदार आपापल्या ठिकाणी मजबूत आहेत. एकही आमदार फुटणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावले.

भाजपचे चार कार्यकर्ते

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स व पोलीस हे भाजपचे चार कार्यकर्ते आहेत, तर राज्यपाल भवन व राष्ट्रपती भवन हे त्यांचे राखीव खेळाडू आहेत. त्यामुळे भाजपने इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करू नये. आणीबाणीपेक्षाही भाजपचे हे कारस्थान वाईट आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नव्या सरकारची थोड्याच वेळात न्यायालयात परीक्षा, कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपसमोर डोकेदुखी

VIDEO : अजित पवारांनी फडणविसांना फसविले, फडणविसांनी राज्यपालांना फसविले

शरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी