31 C
Mumbai
Sunday, June 2, 2024
Homeटॉप न्यूजनव्या सरकारची थोड्याच वेळात न्यायालयात परीक्षा, कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपसमोर डोकेदुखी

नव्या सरकारची थोड्याच वेळात न्यायालयात परीक्षा, कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपसमोर डोकेदुखी

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अजितदादा पवार यांच्या अनपेक्षित पाठिंब्याने भारतीय जनता पक्षाने शनिवारी महाराष्ट्रात गुपचूप सरकार स्थापन केले. पण हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे, आणि त्यावर आता लगेचच ११.३० वाजता सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, रविवार असूनही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेतली आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी रात्री आव्हान याचिका दाखल केली होती. ही याचिका तातडीने सुनावणीला यावी यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे आग्रह धरला होता. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आज रविवार असूनही सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचे जे पत्र दिले आहे ते अवैध आहे. घटनेतील तरतुदींची पायमल्ली करून भाजपने ही सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे विधानसभेचे तातडीने अधिवेशन बोलाविण्यात यावे. भाजपला विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत. विधानसभेतील बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचे न्यायालयाने निरीक्षण करावे, व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा व्हावे, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर न्यायालयात तातडीने सुनावणी होत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसह देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपची डोकेदुखी

कर्नाटकात दीड वर्षांपूर्वी, मे २०१८ मध्ये सत्ता स्थापनेचा असाच संघर्ष झाला होता. भाजपकडे आमदारांची पुरेशी संख्या नव्हती. तरीही कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे नेते येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली होती. त्यासाठी बहुमत सिद्ध करण्याकरीता तब्बल १५ दिवसांचा कालावधी दिला होता. (महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस सरकारला ७ दिवसांचा कालावधी दिला आहे). कर्नाटक राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस व जनता दलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बहुमताचा १५ दिवसांचा कालावधी कमी करून तो अवघ्या २४ तासांवर आणला होता. त्यावेळी शुक्रवारी, १८ मे २०१८ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला होता, त्यात भाजपने दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे असे आदेश दिले होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता विशेष अधिवेशन बोलवावे, व ४.३० वाजण्याच्या आत बहुमत सिद्ध करावे असे न्यायालयाने म्हटले होते. विधानभेच्या हंगामी अध्यक्षांनी नव्या आमदारांना शपथ द्यावी, आणि बहुमताची प्रक्रिया राबवावी त्या व्यतिरिक्त कार्यक्रम पत्रिकेवर अन्य कोणतेही विषय घेऊ नयेत असेही न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे भाजपची गोची झाली होती.

न्यायालयाच्या निकालाचा भाजपला असा बसला होता फटका

भाजपकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळे अन्य पक्षातील आमदार फोडूनच कर्नाटकात भाजपला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार होते. राज्यपालांनी दिलेल्या १५ दिवसांत आमदार फोडाफोडीसाठी पुरेसा कालावधी मिळणार होता. मात्र, न्यायालयाने १५ दिवसांची मुदत अवघ्या २४ तासांवरच आणून ठेवली. त्यामुळे भाजपला अन्य पक्षातील आमदारांना आपल्याकडे आकर्षित करता आले नाही. परिणामी विधानसभेच्या सभागृहात मतदान प्रक्रिया घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला, आणि अल्पमतातील सरकार संपुष्टात आले.

महाराष्ट्रात काय होईल ?

कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातील सध्याच्या सरकार बनविण्याच्या प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते. एक – दोन दिवसांतच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते अशी शक्यता आहे. न्यायालयाने असा आदेश दिला तर २४ तासांत देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याची कसरत करावी लागेल. सध्या भाजपकडे १०५ आमदार आहेत. अपक्षांचा पाठिंबा मिळून ही संख्या १२५ पर्यंत वाढली आहे. तरीही आणखी २० आमदारांची भाजपला गरज आहे. अजितदादांच्या पाठिंब्यामुळे भाजपला हे २० आमदार फोडता येतील अशी अपेक्षा होती. परंतु अजितदादांसोबत सध्या तीन ते चारच आमदार आहेत. त्यांच्यावरही पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. हे तीन ते चार आमदार मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिले किंवा तटस्थ राहिले तरीही भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांतून किमान २० ते २५ आमदार फोडणे गरजेचे आहे. तरच विधानसभेत बहुमत सिद्ध शक्य होईल.

आमदार फोडण्यात भाजप यशस्वी होईल का ?

अजितदादांच्या गद्दारीनंतर शरद पवारांनी काल एकाच दिवसांत जोरदार सूत्रे हलवली. अजितदादांबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांना शरद पवार, सुप्रिया सुळे व इतर नेत्यांनी स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवळपास ८ आमदार परत आले आहेत. अजितदादांबरोबर अवघे ४ ते ५ आमदार उरले असल्याचे सध्या चित्र आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेनेही आपले सगळे आमदार विविध हॉटेलांमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. भाजप नेत्यांचा आपल्या आमदारांपर्यंत संपर्कही होणार नाही, याची काळजी हे तिन्ही पक्ष घेत आहेत. त्यामुळे आमदार फोडण्यात भाजप कितपत यशस्वी होऊ शकेल याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अजित पवारांनी फडणविसांना फसविले, फडणविसांनी राज्यपालांना फसविले

शरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण

राष्ट्रवादीचे सहा आमदार लंपास, इतर आमदारांना वाचविण्याचे प्रयत्न

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीत, ना…बँड..ना बाजा.. ना..बाराती : अहेमद पटेल

शरद पवार यांना एका संतप्त कार्यकर्त्याचे पत्र

अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचे पत्रही पळवले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी