25 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमुंबईपदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केले पहिले काम, आजारग्रस्त महिलेला सव्वा लाखाचा धनादेश जारी

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केले पहिले काम, आजारग्रस्त महिलेला सव्वा लाखाचा धनादेश जारी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री या नात्याने सगळ्यात चांगले काम कोणते केले असेल, तर त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने अनेक गोर गरीबांना आर्थिक मदत केली. आज सुद्धा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली, आणि पहिले काम केले ते एका आजारग्रस्त महिलेला मदत केली. सव्वा लाख रूपयांच्या धनादेशावर त्यांनी स्वाक्षरी केली, अन् तो धनादेश एका आजारग्रस्त महिलेला देऊ केला.

दादर येथील कुसूम किरण वेंगुर्लेकर या महिला कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांना तातडीची आर्थिक मदत हवी होती. याबाबतची माहिती नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती. आज सकाळी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी कै. चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, आणि मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्विकारण्याचे सोपस्कार पार पडले, आणि त्यानंतर कुसूम वेंगुर्लेकर यांना धनादेश दिला. वेंगुर्लेकर यांना कॅन्सरचा आजार झाला आहे. त्यांना तातडीने मदत आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची मदत दिल्यामुळे वेंगुर्लेकर व त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून ओमप्रकाश शेट्ये हे गेली पाच वर्षे जबाबदारी सांभाळतात. शेट्ये यांनी या कक्षाचे काम तळागाळात पोचविण्यासाठी फार कष्ट उपसले. अनेक गोरगरीबांचे त्यांनी भले केले. जवळपास ११०० कोटी रुपयांची मदत लाखो रूग्णांना मिळवून दिली. त्यामुळे केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधी पक्षांच्या आमदारांमध्येही मुख्यमंत्र्यांचा हा कक्ष लोकप्रिय झाला आहे.

विशेष म्हणजे, साधारण गेले १० दिवस फडणवीस मुख्यमंत्री पदावर कार्यरत नाहीत. तरीही वैद्यकीय मदतीसाठी त्यांच्याकडे गरजू रूग्णांचे मेसेजेस येत होते. फडणवीस या सगळ्या मेसेजेसची दखल घेत होते. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी अशा गरजू रूग्णांना अन्य कोणत्याही मार्गातून मदत करणे चालू ठेवा अशी सुचना फडणवीस यांनी ओमप्रकाश शेट्ये यांना केली होती. सत्ता संघर्ष शिगेला पोचलेला असतानाही मुख्यमंत्र्यांनी आजारग्रस्तांना मदत करण्याचे कार्य थांबू दिले नाही. अशा मुख्यमंत्र्यांकडे मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो, अशी भावना शेट्ये यांनी ‘लय भारी न्यूज नेटवर्क’शी बोलताना व्यक्त केली.

वैद्यकीय कक्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रपती राजवटीच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद झाला होता. या कक्षाचे काम अद्याप ठप्प आहे. परंतु हा कक्ष त्वरीत सुरू व्हावा यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही राज्यपालांकडे मागणी केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे हा कक्ष लवकर सुरू करून गरजू रूग्णांना पुन्हा वैद्यकीय मदतकार्य सुरू करावे अशी भावना सामान्य लोकांमधून व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी