28 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंदर् फडणवीस यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. थोड्याच वेळात ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन राजीनामा देणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यानंतर काही वेळातच फडणवीस यांनी राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपविला. त्यांच्यासोबत नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत पाटील आदी नेते होते.

राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही अगोदरच सांगितले होते की, अन्य पक्षांचे आमदार आम्ही फोडणार नाही. घोडेबाजार करणार नाही. पण अजितदादा पवार यांनी आम्हाला सहकार्य केले होते. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण गट आम्हाला मिळाला म्हणून आम्ही सरकार स्थापन केले होते. अजितदादांनी पत्र दिले होते, त्या आधारे सत्ता स्थापन केली होती. पण आज अजितदादा मला भेटले, आणि काही कारणांमुळे मी आपल्यासोबत राहू शकत नाही. मी राजीनामा देत आहे असे सांगून त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे बहुमत राहिलेले नाही. परिणामी मी आता राजीनामा देणार आहे. नव्याने सत्ता स्थापन करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी चांगले सरकार चालवावे. पण हे सरकार ओझ्याखाली दबेल. मोठा विरोधाभास असलेले नवे सरकार असेल. तीन चाके असलेले सरकार असेल. ऑटो रिक्षाची तीन चाके तीन दिशेला धावली तर काय अवस्था होईल. शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. ही किती मोठी लाचारी आहे. पण त्यांना ही लाचारी लखलाभ असो. सत्तेसाठी हे लाचार आहेत. भाजप प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करेल. आम्ही जनतेचा आवाज बनू. जनतेला न्याय देण्याचे काम करू. मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. पाच वर्षांत जनतेचे आम्हाला भरपूर प्रेम मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शिवसेने भाजपशी फारकत घेतल्याबद्दल फडणवीस यांनी यावेळी तोंडसुख घेतले. महाराष्ट्रात भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या. आम्ही शिवसेनेसोबत होतो. आम्हाला ६७ टक्के जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ४० – ४२ टक्के जागा मिळाल्या होत्या. भाजपला मोठा जनादेश होता. जनतेच्या मनातले सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत कधी ठरलेच नव्हते. पण निवडणुकीनंतर नंबर गेममध्ये बार्गेनिंग पॉवर वाढू शकते हे शिवसेनेच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी बार्गेनिंग करायला सुरूवात केली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचे कधी ठरलेच नव्हते. निवडणुकीच्या आधी व नंतरही अमित शाह यांनी स्पष्ट केले होते. पण तुम्ही मुख्यमंत्री देणार नसाल तर आम्ही कुणाही सोबत जाऊ अशी शिवसेनेने भूमिका घेतली. त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जायची तयारी केली. मातोश्रीवरून जे लोकं इतरांकडे जात नव्हती, ती लोकं अनेकांच्या घरांच्या पायऱ्या झिजवू लागले.

सुरूवातीला विधानसभेची मुदत संपल्याने आम्हाला राज्यपालांनी बोलाविले होते. पण आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे सांगितले होते. नंतर राज्यपालांनी शिवसेनेला बोलाविले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावले. त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर हे तिन्ही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या नावाखाली नुसत्याच बैठका घेत होते. सत्ता स्थापनेचा समान कार्यक्रम आखत होते. भाजपला दूर ठेवणे एवढाच त्यांचा कार्यक्रम होता. अशातच किती काळ राष्ट्रपती राजवट राहील अशी भावना ठेवून अजितदादा पवार आम्हाला येऊन भेटले. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले होते. त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मी सुद्धा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात व जयंत पाटील उपमुख्यमंत्री

नवे सरकार लवकर सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत, तर बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे दोन उपमुख्यमंत्री असतील. या मंत्र्यांचा उद्याच शपथ घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच बहुमताची परीक्षाही उद्याच आयोजित केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

…आता उद्धव ठाकरे असतील नवे मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतला राजकीय संन्यास

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी