28.2 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयचिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला...

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

राज्यात सलग दोन दिवसापासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार शेखर निकम हे देखिल उपस्थित होते. दरम्यान, वाशिम, हिंगोली, नांदेड, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे.

राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वाशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

दरम्यान कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा लागल्यानंतर जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच जोरदारपणे पावसानं हजेरी लावली. यामुळं शेतकऱ्यांची चिंता दुर होणार आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास या पावसाची मोठी मदत मिळणार आहे. हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस, हळद, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळणार आहे. तर जोरदार झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या मोसमातील पहिलाच दमदार पाऊस नांदेडमध्ये झाला.

हे सुद्धा वाचा:

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरण चिघळलं, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं ट्विट चर्चेत

अमली पदार्थ गैरव्यवहारात सहभागी अधिकारी बडतर्फ केला जाईल – गृहमंत्री फडणवीस

राज्यात सरकारी खात्यातील अडीच लाख पदे रिक्त

या पावसाने जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. त्यासोबतच जलसाठ्यात वाढ होण्यास देखील मदत होणार आहे. वर्ध्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र नदी नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहेत. वर्ध्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला असून आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसानंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे. तर समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीत लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पातून 12.12 घनमीटर प्रतिसेंकदाने विसर्ग सुरु आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी