30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईWater tension! लाइट आली, आता पाण्याचे टेन्शन!

Water tension! लाइट आली, आता पाण्याचे टेन्शन!

टीम लय भारी

मुंबई : पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. (Water tension) महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयसी केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत वीज बंद झाली होती. अखेर दोन तासानंतर दक्षिण मुंबई व उपनगरांत तसेच, ठाणे, कल्याण भागांत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. मात्र, २ ते अडीच तास मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबई व उपनगरांतील वीज पुरवठा आज दुपारी सुमारे साडेतीन तास ठप्प होता. युद्धपातळीवर बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी पाणीपुरवठ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. मुंबईत विद्युत पुरवठा आज सकाळी काही तास खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. ज्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यावर त्याचा अंशतः परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. याअनुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने नमूद केले आहे. नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टेमघर येथील ठाणे महानगरपालिकेचे व स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपीग बंद झाले होते. यामुळे ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर पिसे व टेमघर येथील पंपीग सुरू करण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तरीही रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे ठाणे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये वीजपुरवठा करणा-या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आले. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेलाही या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. तर रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

तब्बल साडेतीन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. मात्र याचा खूप मोठा फटका अनेक सेवांना बसला. लोकलसेवा ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकजण लोकल मध्येच अडकून पडल्याने प्रवाशांना रुळांवरून पायपीट करावी लागली. अनेक रुग्णालयांनाही याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एक उच्चस्तरिय बैठकही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने या वीज गोंधळावरून सरकारला धारेवर धरले आहे. याप्रकरणी चौकशी करून जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी