26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
HomeराजकीयLay Bhari : वीज बिलांच्या प्रश्नावर शरद पवारांना भेटा, राज्यपालांचा राज ठाकरेंना...

Lay Bhari : वीज बिलांच्या प्रश्नावर शरद पवारांना भेटा, राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला

टीम लय भारी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. (Lay Bhari : Meet Sharad Pawar on electricity bill, Governor advises Raj Thackeray) वाढीव वीज बिले कमी करण्या संदर्भात सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, यासंदर्भात ठाकरे यांनी कोश्यारी यांना निवेदन दिले. यावर कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना वीजबिल प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे.

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून वीज बिल प्रश्नी होणा-या दिरंगाईवर सरकारवर नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, राज्यातील वाढीव वीज बिलाचा प्रश्न काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या संदर्भात आमचे पदाधिकारी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांच्या अधिका-यांना जाऊन भेटले होते. मात्र, त्यावर काही तोडगा निघाला नाही.

वीज वितरण कंपन्यांच्या अधिका-यांची भेट घेतली असता, त्यांनी वीज बिल कमी करण्याचा मुद्दा हा एनईआरसीच्या मान्यतेनंतरच सोडवला जावू शकतो, असा दावा केला. त्यावर आमचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ एनईआरीसीच्या अधिका-यांना भेटले. मात्र, त्यांनी हा प्रश्न वीज वितरण कंपन्या स्वत: सोडवू शकतात असे स्पष्ट केले. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांकडून टोलवा टोलवी केली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

या वीज बिल प्रश्नी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीन राऊत यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ याशिवाय दुसरे काही आश्वासन दिले नाही. सरकारकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तत्काळ सुटला पाहिजे, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक समस्या सुरू आहेत. त्यात हा वीज बिल वाढीचा फटका सहन करावा लागत आहे. म्हणून आज राज्यपालांना भेटून निवेदन दिले असल्याचे सांगितले. तसेच राज्यपालांच्या या भेटीत कोश्यारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे, असे राज यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असे सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी