28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजBihar election : बिहार निवडणुकीत कोण बाजी मारणार? नितीशकुमार की तेजस्वी? आज...

Bihar election : बिहार निवडणुकीत कोण बाजी मारणार? नितीशकुमार की तेजस्वी? आज निकाल

टीम लय भारी

पाटणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत (Bihar election) कोण बाजी मारणार याचा रिजल्ट मंगळवारी १० नोव्हेंबरला लागणार आहे. अखेरच्या तिस-या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार बाजी मारणार की तेजस्वी यादवांची सरशी होणार याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळणार आहे. दरम्यान, देशभरातील विविध एक्झिट पोलनुसार निवडणुकीत एनडीएला फटका बसण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राजद यांचे महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने 55 मतमोजणी केंद्रे स्थापन केली असून तेथे सीएपीएफच्या कंपन्या आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. मतदानाच्या वेळी कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असलेला कक्ष आणि मतमोजणी केंद्रे येथे त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, बिहार लष्करी पोलीस दल आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अशी रचना करण्यात आली आहे, असे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणुकीत राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला विजय मिळणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आल्यानंतर राजदने पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजय साजरा करताना भान ठेवण्याचा इशारा दिला आहे. आनंदाप्रित्यर्थ हवेत केलेला गोळीबार अथवा प्रतिस्पर्ध्याला हिणविण्यासाठी केलेले असभ्य वर्तन कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही, असे पक्षाच्या वतीने ट्विट करण्यात आले आहे.

गेल्या 15 वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक भाजपप्रणित एनडीएच्या अपेक्षेपेक्षा चुरशीची ठरली.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. मात्र, चिराग पासवान यांनी तिन्ही टप्प्यांमध्ये महायुतीत न राहूनही मी भाजपासोबत, असाच नारा देत महायुतीची मते फोडण्याचे लक्ष्य ठेवले होते. यानुसार सर्व्हेमध्ये पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे.

जल्लोष नको, तेजस्वी यादवांचा संदेश

 

एक्झिट पोलनी तेजस्वी यादव यांच्या राजद आघाडीला बहुमताचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यामुळे कोरोना संकटात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत विजयाचा जल्लोषही मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची शक्यता आहे. यावर तेजस्वी यादव यांनी नेत्यांना महत्वाची सूचना जारी केली आहे. राजदच्या उमेदवारांनी विजयी झाल्यानंतर विजयाची रॅली किंवा जल्लोष साजरा करू नये. विजयाचा उत्सव जनता साजरा करेल. मतमोजणीवेळी उमेदवारांनी त्यांच्याच मतदार संघात रहावे आणि विजयी झालेल्यांनी त्यांना मिळालेले सर्टिफिकेट घेऊनच पाटन्याकडे कूच करावे, असे आदेश दिले आहेत.

निकालाआधीच काँग्रेसचे दोन नेते पाटणा मुक्कामी

 

निकालाआधीच महाआघाडीची चिंता वाढली आहे. बिहारमध्ये महाआघाडी सत्तेवर येणार असल्याचे निकालपूर्व चाचण्यांतून दिसून आले आहे. मात्र, त्याचबरोबर आमदारांचा घोडेबाजार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांना कोरोना झाला असून क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडे आणि रणदीप सुरजेवाला यांना निकालानंतर बिहारमध्ये निर्माण होणारी राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी आधीच पाटणाला पाठवले आहे. विजयानंतर रॅली न काढण्याच्या सूचना काँग्रेसने उमेदवारांना दिल्या आहेत. त्याचबरोबर घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांना पाटणातील एका हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी