28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूज80 वर्षांचा अवलीया..

80 वर्षांचा अवलीया..

@अतुल माने (ज्येष्ठ पत्रकार)

जे नावच अलौकिक आणि अशक्य बाबी शक्य करण्याची ताकद असलेले असते, ज्याच्या नावातूनच शरद ऋतू आणि चंद्राची शीतलता याचा विलक्षण मिलाप आहे अशा एका ‘ पॉवर ‘ फुल नावाचा घोष करून एकही दिवस जात नाही, वय आणि दुर्दम्य आजारावर आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्तीने मात करत वाटचाल करणारा एक अवलिया म्हणजे शरद पवार

जिथे शक्यता संपते तिथे अशक्यतेच्या परिघातून लीलया मात करत इस्पित साधण्याची कला म्हणजे शरद पवार. अष्टकलेचे निपुणत्व घेऊन या पृथ्वीवर आलेल्या या शरद पवार या दोन नावात आख्खे विश्व व्यापलेले आहे. जिथे एखादी रेषा अंधुक आणि धूसर होते तिथे या अवलीयच्या स्पर्शाने सर्व काही पालटून जाते. शिव्या शाप , आरोप यांच्या जोरावरच या व्यक्तीचे जगणे अखंड सुरू असते. केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशातील राजकारणात हे नाव घेतल्या शिवाय एकही दिवस जात नाही.

80 वर्षांचा अवलीया..

गेली 50 वर्षे समाजकारण, राजकारण आणि सहकार यामध्ये ध्रुव स्थानी असलेले एकमेव नाव म्हणजे शरद पवार.  शक्यता आणि अविश्वसनीयची सीमा रेषा ओलांडून प्रत्येक घटनेचा संदर्भ ज्याच्याशी जोडला जातो ,  ज्याच्या अंतर्मनाची खोली किती आहे हे प्रकाट

पंडितानाही आजपर्यंत शोधणे मुश्किल झाले  आहे,  अगदी भूकंपापासून ते महापूर आणि वादळापर्यन्त ज्याचे नाव सातत्याने जोडले जाते, पण नावातच शरद ऋतू मधील सदाबहारपण नसानसात भिनला आहे असा हा एक 80 वर्षाचा अलौकिक आणि अविश्वसनीय माणूस.

आपल्या नावातच गूढ पॉवर असलेली ही कल्पनेच्यापलीकडील व्यक्ती. कोठे सबंध असो कि नसो पण ही दोन शब्द सर्वत्र आपसूक जोडली जातात. मनाचा थांगपत्ता लागू न देता अविरत काम करणारा हा 80 वर्षाचा युवक आजही तेवढ्याच जोमाने आणि उमेदीने धावतोय. धुवांधार पावसात  हजारो,  लाखो लोकांमध्ये आग आणि अंगार चेतविण्याची धमक आणि शक्ती असलेला हा युवक.

आरोप प्रत्यारोपाच्या अग्निकुंडात अनेकदा स्वाहा होऊनही पुन्हा नव्याने जन्म घेण्याची जबरदस्त आत्मशक्ती., दाऊद पासून महाकाय भूकंप , वादळ , महापूर यांच्याशी शरद पवार या दोन शब्दाचा  सातत्याने सबंध जोडला गेला. पण हे दोन ‘पॉवर’  फुल शब्द हिमालयाच्या निधडया छातीचा कोट करून आलेली सर्व आक्रमण परतवून लावण्यात नेहमीच यशस्वी ठरले. अगदी अलीकडेच ईडी ला त्यांनी आपल्या धगीने काडी लावून  भस्मसात केले.  जनमानसात अंगार चेतविण्याची विलक्षण शक्ती या युवकात ठासून ठासून भरलेली आहे.

राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर शरद पवार हे दोन शब्द नेहमीच चर्चेत राहिले आहेत आणि यापुढेही राहत जाणार. कधी कधी ही दोन शब्द  अविश्वास आणि धोका या दोन समिकरणातून पाहण्यात आली. पण राजकारणात डाव आणि प्रतिडाव खेळण्यात माहीर असलेल्या या युवकावर त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. नेहमी मित्रापेक्षा आसपास जादा  शत्रूंना घेत मार्ग क्रमण करताना कोणती चाल हा तरूण खेळणार हे भल्याभल्याना कधीही लक्षात येत नाही.

ज्याच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला अथवा पाठीवर शाबासकी दिली की त्याचा पत्ता कट अशा अनेक सुरस कथा नेहमीच सांगितल्या जातात. एकाच दगडात अनेक पक्षी टिपण्याची कला अवगत असलेल्या पवार यांची नजरही तेवढीच तेजतर्रार. एकदा भेटलेल्या व्यक्तीचे नाव तसेच आडनावही ते कधीही विसरत नाहीत. चांदा ते बांदा कोणत्याही गावातील व्यक्तीला ने नावाने हाक मारतात एवढी अफाट बुद्धिमत्ता लाभलेला हा अवलिया राजकारणी.

राजकारण आणि समाजकारण याची उत्तम सांगड घालून अविरतपणे काम करण्याची क्षमता या युवकात ठासून भरलेली आहे. उत्तम व्यासंग आणि अफाट वाचन हे या युवकाचे खास वैशिष्ट्य. कोणतेही क्षेत्र त्याला व्यर्ज नाही. कोणत्याहो गोष्टीची सखोल माहिती घेऊन त्याचा सांगोपांग विचार करण्यात हा युवक नेहमीच आसुसलेला असतो.

राजकारणाच्या पलीकडे असलेल्या आसमतांमध्येही हा ध्रुव तारा सातत्याने चमकत असतो. नवनवीन प्रयोग आणि कल्पनाशक्ती याच्या जोरावर चर्चेत राहताना वादाच्या धुळवडी मध्येही हा युवक न्हाऊन निघतो. संयम आणि समोरच्याचा योग्य वेळेत समाचार घेण्यामध्ये याचा हातखंडा. राज्य असो की देश रोज कोणत्या ना कोणत्या घटनेनंतर या तरुणाचेच नाव जोडण्याचा अनेकांना वर्षोनुवर्षे छंद जडला आहे. पण टीका आणि आरोपाकडे दुर्लक्ष करीत या युवकाचा अखंड प्रवास सुरूच राहतो.

किलारीच्या महाभयंकर भूकंपाच्या वेळी हाच तरुण सर्वात आधी तिथे पोहोचला होता. उध्वस्त झालेली गावे पुन्हा उभी करण्याचे कठीण आव्हान स्वीकारून त्याने ते यशस्वीपणे पूर्ण केले. महिला स्वावलंबी राहावी म्हणून 33 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय देशात पहिल्यांदाच घेऊन त्यांनी महाराष्ट्र चा आदर्श सर्वांसमोर ठेवला. सहकाराच्या माध्यमातून त्याने अनेक विकासपयोगी निर्णय घेतले.

राज्याच्या आणि देशाच्या समाजकारण , राजकारण, शेती उद्योग , क्रीडा, साहित्य , आदी सर्व क्षेत्रात ज्या एकाच व्यक्तीचे नाव सातत्याने आणि आवर्जून घेतले जाते, अनेक धुरंधराना ते गुरुस्थानी असतात , अविश्वास ही विश्वास ठेवू शकत नाही अशी ज्यांची राजकीय खेळी असते अशा शरद गोविंदराव पवार या 80 वर्षाच्या युवकाला शतकी नव्हे तर द्विशतकी खेळी करण्याचे आयुष्य विधात्याने देवो हीच मनापासून प्रार्थना..

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी