28 C
Mumbai
Saturday, June 22, 2024
HomeराजकीयBJP Politics- एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली!

BJP Politics- एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली!

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेची उमेदवारी (MLC Election) नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पक्षावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर खडसेंनी पुन्हा पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेमधून पक्षात आले. त्यांना पक्षाचा इतिहास माहीत नाही. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान शून्य असल्याचे खडसे म्हणाले.

इतरांना मोठे करण्याची भाजपची संस्कृती

विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसेंनी भाजपावर शरसंधान साधले. निष्ठावंतांना तिकीटे नाकारली जातात आणि बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, असा आरोप खडसेंनी केला. त्यावर खडसेंना आतापर्यंत खूप काही दिले, असा विचार करून केंद्रीय नेतृत्त्वाने त्यांना तिकीट नाकारले असावे, असे पाटील म्हणाले. आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठे करण्याची आमची संस्कृती असल्याचे पाटील यांनी सांगितले. वसंतराव भागवत यांना पक्षाकडून काहीच मिळाले नाही. मुंडे, महाजन त्यांना गुरू मानायचे. भागवत यांनी नेते घडवले, असे पाटील यांनी सांगितले.

नाथाभाऊंना किती द्यायचे?

एकनाथ खडसेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या पदांची यादीच वाचून दाखवली. नाथाभाऊंना किती द्यायचे? खडसे सात वेळा आमदार झाले. दोन वेळा त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली. मुलीला विधानसभेची उमेदवारी दिली, मुलालाही उमेदवारी दिली, त्यांना विरोधीपक्ष नेता केले. मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. खडसे यांच्या पत्नीला महानंदाचे अध्यक्षपद देण्यात आले. आता त्यांनी पक्षामध्ये वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहावे असे केंद्राने विचार केला असेल, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाठीत खंजीर नक्की कोणी खुपसले?

पाठीत खंजीर खुपसल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती. त्यावरुनही पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले होते. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी बागडेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? जगवानी यांना देण्यात आलेले विधान परिषदेचे तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा तुम्ही जगवानी यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी विचारले.

जे काही मिळवले, ते स्वत:च्या हिमतीवर

खडसे कुटुंबाला पक्षाने खूप काही दिले, या पाटील यांच्या विधानाचा एकनाथ खडसेंनी समाचार घेतला. आम्ही जे काही मिळवले, ते स्वत:च्या हिमतीवर मिळवले. ज्यावेळी कुणीही पक्षात यायला तयार नव्हते, उमेदवारी घेत नव्हते, त्या काळात मी निवडून येत होतो. मी आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही. आता पक्षात सक्रीय झालेल्यांना पाटील यांना हा इतिहास माहीत नाही, अशा शब्दांत खडसेंनी पाटील यांचा समाचार घेतला.

भाजपामधल्या घराणेशाहीची यादी

तुम्ही माझ्यावर घराणेशाहीची टीका करता. माझ्या घरात केवळ मला आणि सुनेलाच तिकीट देण्यात आले, असे म्हणत खडसेंनी भाजपामधल्या घराणेशाहीची यादीच वाचली. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. देवेंद्र मुख्यमंत्री होते. त्याआधी आमदार राहिले. त्यांच्या काकू मंत्री होत्या. २६ वर्षे आमदार होत्या. ही घराणेशाही नाही का? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. रावसाहेब दानवे मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पाटलांच्या घरात आमदारकी खासदारकी आहे. याला घराणेशाही म्हणायचे नाही, मग काय म्हणायचे, असा सवालदेखील खडसेंनी विचारला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी