29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeएज्युकेशनकातकरी समाजातील विद्यार्थिनीला बारावीच्या परिक्षेत उत्तुंग यश

कातकरी समाजातील विद्यार्थिनीला बारावीच्या परिक्षेत उत्तुंग यश

भीमाशंकर येथील शिनोली ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर य़ेथील उमा विलास वाघ या आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थिनीला बारावीच्या परिक्षेत ७७.६७ टक्के गुण मिळालेले आहेत(A student from Katkari community excelled in class 12th examination). अतिशय प्रतिकूल परिस्थिताची सामना करत तिने हे यश संपादित केले आहे. तिच्या याच संघार्षाची दखल घेत तिला आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र या संस्थेतर्फे नुकतेच सन्मानित केले आहे. शिवाय तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे संस्थेचे सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.
शिनोली या परिसरात इंदिरानगर नावाची कातकरी व ठाकर समुदायाची वस्ती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने , आर्थिक स्थैर्य नसल्याने २०१८ साली दहावीला उत्तीर्ण झाल्यानंतर उमाला ११वी ला मध्येच शिक्षण सोडावे लागले. आई आणि बहीणीचं आजारपण होतंच. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत उमाने वडिलांसोबत मासेमारी , शेतमजुरी अशी भेटेल ती कामे केली. मात्र शिक्षणाची ओढ ही होतीच. शिकण्याची इच्छा कायम होती. दोन वर्षांपूर्वी प्रा. स्नेहल साबळे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ‘महाराष्ट्रातील आदिवासी कातकरी जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास’ यावर पीएचडी चा अभ्यास करत असून त्यांची आणि उमाची भेट इंदिरानगर येथे झाली. तिची एकूण शैक्षणिक पार्श्वभमी लक्षात घेत तिला ११ वीला प्रवेश मिळवून देण्यात आला. मिळालेल्या संधीला हातातून निसटू न देता उमानेही या संधीचं सोनं केलं. १२ वीत पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करत परिस्थितीवर, अडचणींवर मात करत तिने १२ वी मध्ये घवघवीत य़श संपादित केलं. आणि आता ती पुढे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत उच्च शिक्षण घेणार आहे. आदिवासी समाज ज्याला नेहमीच मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात येतं. जिथे रोजच्या दैनंदिन जगण्यासाठी तारेवरची कसरत आदिवासी समाजाला करावी लागते. त्यामुळे शिक्षणासाठीचा प्रवास हा नक्कीच इतर विद्यार्थ्यांसारखा उमासाठी नक्कीच सुकर नव्हताच. अडचणींवर मात करत आपलं लक्ष्य पुढे ठेवून ते साध्य कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उमा विलास वाघ आहे. नक्कीच ती इतर विद्यार्थ्यांसाठी, तरूण -तरूणींसाठी प्रेरणा ठरणार आहे. डॉ. अमोल वाघमारे आणि प्रा. स्नेहल साबळे यांसारखे मार्गदर्शक उमा सारख्या विद्यार्थ्यांना लाभले तर नक्कीच अडचणींवर मात करत अशा अनेक उमा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतील. उमा विलास वाघ या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस आदिम संस्थेचे डॉ. अमोल वाघमारे, प्रा. स्नेहल साबळे, समील गारे, बोरघर ग्रामपंचायत सदस्य आणि एसएफआय पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक वालकोळी, दिनेश वालकोळी, सतीश लोहकरे जनवादी महिला संघटनेच्या सुप्रिया मते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी