28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeआरोग्यCoronavirus पसरविणाऱ्या वटवाघळांना समजून घेताना ( भाग 2 )

Coronavirus पसरविणाऱ्या वटवाघळांना समजून घेताना ( भाग 2 )

  • डॉ. महेश गायकवाड ( M.Sc. Ph.D. Environment Science )
  • वटवाघूळ तज्ज्ञ,
  • बारामती 9922414822

‘कोरोना’ने ( Coronavirus ) जगाला पछाडले आहे. इटली व स्पेन या दोन्ही देशांमध्ये तर मृत्यूचे तांडव माजले आहे. हा विषाणू जिथून उद्भवला त्या वटवाघळांविषयी डॉ. महेश गायकवाड यांनी लिहिलेला लेख ‘लय भारी’ने ( लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ) प्रसिद्ध केला होता. या लेखामुळे सामान्य लोकांमध्ये भारतीय वटवाघळांविषयी कुतूहल निर्माण झाले. अनेकांना शंका निर्माण झाल्या. त्या पार्श्वभूमीवर डॉ. गायकवाड यांनी वटवाघळांविषयी आणखी माहिती देणारा दुसरा लेख लिहिला आहे.

नमस्कार मित्रांनो. मी परवा एक लेख लिहिला होता. त्या पार्श्वभूमीवर मी पुन्हा सांगू इच्छितो की, सध्या जग बंद आहे त्याला कारण वटवाघळे नसून चिनी माणूसच आहे. कारण भारतीय वटवाघळांमुळे आज पर्यंत ‘कोरोना’ ( Coronavirus ) झालेला एकही माणूस भारतात नाही.

Coronavirus , BAT
वटवाघळांमुळे अनेक प्रकारचे विषाणू माणसांमध्ये आले आहेत.

बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत त्यातली काही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. सुरुवातीला मला इथे नमूद करावंसं वाटतं की, जगभरात 1013 जातीची वटवाघुळं आहेत. यामध्ये भारतात 123 जातींची वटवाघळे असून महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. यामध्ये 20 % वटवाघळं फलहारी आहेत आणि 80% वटवाघळं किटकभक्षी आहेत.

फलहारी वटवाघळांमुळे निपाह सारखे विषाणू फळांमधून आपल्याकडे येतात. मात्र भारतातील वटवाघळांमुळे आजपर्यंत आपल्याकडे असे विषाणू आलेले नाहीत.  इंडोनेशियामधील वटवाघळांमुळे त्या देशात निफाह सारखी साथ गेल्या वर्षी आली होती.  तिथून केरळमधील काहींना निपाह विषाणूची लागण झाली. या प्रकरणामध्ये सुद्धा भारतीय फलहारी अर्थात झाडावर राहणारी वटवाघळे कारणीभूत नव्हती, नाहीतच.

Coronavirus , BAT
हे ताजे छायाचित्र इंडोनेशियातील आहे. तिथे बिनधिक्कतपणे बाजारात वटवाघुळे विक्रीसाठी मांडली जातात.

किटकभक्षी गुहेतील वटवाघळांमुळे जगात कोरोना विषाणू ( Coronavirus ) आला. तो गुहेत राहणाऱ्या वटवाघळांमुळेच. अर्थात 800 पेक्षा जास्त जातींची वटवाघळे गुहेत राहतात. मात्र त्यातील ‘हॉर्स शु बॅट’ यामधील जवळपास 50 प्रजाती आहेत. ‘कोरोना’ हा विषाणू ( Coronavirus ) माणसापर्यंत आला. त्याला कारण या जातीची वटवाघळं चिनी लोकांनी गुहेत जाऊन पकडून माणसात आणली. खाण्यासाठी आणलेल्या वटवाघळांना विषाणूची लागण झाली. कारण पिंजऱ्यात त्यांची उपासमार होते आणि परिणाम ‘कोरोना’ विषाणू ( Coronavirus ) त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात वाढतो. अशी वटवाघळे हाताळली आणि खाल्ल्यामुळे चिनी माणसांना जगात पहिल्यांदा कोरोना झाला. त्यामुळे मग जगभर धुमाकूळ सुरू आहे.

आपल्‍याकडे कोरोना ( Coronavirus ) यायचं कारण चीन, इटली, दुबई, इराण व अमेरिकेमधून विमान प्रवास करून आलेले लोक आहेत. मात्र त्यांना सुद्धा त्याची जाणीव कुठे होती.  म्हणून आज आपण सर्वजण काळजीत आहोत.

आता आपण विचार करुयात की, हा व्हायरस कुठल्या वटवाघळामुळे नेमका आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. मला शंभर टक्के खात्रीने सांगायचंय की, भारतातील वटवाघळांमुळे आजपर्यंत कुठलाही ‘कोरोना’सारखा ( Coronavirus ) अत्यंत घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. तसं एकही रेकॉर्ड माझ्या वाचनात किंवा अनुभवात नाही. त्यामुळे विनाकारण घाबरून जाण्यापेक्षा आपण या विषयी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Coronavirus , BAT
भारतातील वटवाघुळांमध्येही विविध जाती आहेत.

यामध्ये ‘हॉर्स शू’ अशा नावाची अनेक जातींची वटवाघुळ भारतात सुद्धा आहेत. मात्र ही वटवाघळे 100% घनदाट जंगलातील गुहेतच राहतात. ही वटवाघळं साधारणपणे 19 डिग्री तापमानाला गुहेमध्ये अंधाऱ्या जागेत लटकून राहतात. अशी वटवाघळे तापमान वाढलं तर जगू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारतीय लोकांचा आणि जंगलातील गुहा यांचा कधीही संबंध येत नाही. दुसरी गोष्ट या वटवाघळांमुळे आज पर्यंत भारतात ‘कोरोना’ ( Coronavirus ) पसरला असे एकही प्रकरण नाही.

मुळातच चिनी लोकांकडून कोरोना जगभरात गेला आणि त्यामुळे भारतात अनेकजण घाबरले. घाबरणे सहाजिक आहे. मात्र त्याबद्दल शास्त्र काय सांगते हे जाणून घेणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या गावात अवतीभवती अनेक प्रकारची वटवाघुळ किंवा आपण त्यांना पाकोळ्या सुद्धा म्हणतो ही असतात.

काही वटवाघळे झाडांवर राहतात.  काही गुहांमध्ये राहतात, तर काही भिंतींच्या कपारीमध्ये राहतात. Flying foxex नावाची वटवाघळे झाडांवरती राहतात ही वटवाघळे वर्षभर स्थलांतर करीत असतात. साधारणपणे दोनशे किलोमीटर पर्यंत टप्पा हा त्यांचा स्थानिक स्थलांतराचा असतो. त्याच्यामुळे अनेक जणांना वाटत असेल की गेल्या आठवड्यात पाहिलेली झाडावरची वटवाघळे या आठवड्यात मला दिसत का नाहीत.

या वटवाघळांकडून कोरोना विषाणू ( Coronavirus ) आला का, तर तसे अजिबात घडले नाही. भूकंप किंवा पाऊस अशा गोष्टी वन्यजीवांना कळतात. काही प्रमाणात मात्र स्थानिक स्थलांतर हा त्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थलांतर नेमके ठराविक महिन्यातच होत असते. कारण पाण्याचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे जास्त पाणी असेल अशा भागात स्थलांतर करुन तिथे असणारी वड, पिंपळ, जांभूळ, आंबा अशा स्थानिक विविध प्रकारच्या झाडांवर ही वटवाघळे आसरा घेतात.

त्यामुळे विनाकारण वटवाघळांना घाबरून किंवा आसपासची झाडे तोडून पुन्हा एकदा पर्यावरण विनाशाकडे जाऊ नये. कोणीही घाबरून न जाता आपण निवांतपणे आपल्या घरात राहावं. त्यांनाही त्यांच्या घरात राहू द्यावं. एवढाच नियम आपण सर्वांनी पाळूयात.

आपल्या अवतीभवती झाडावर छोटी-मोठी वटवाघळे फळे खाऊन टाकत असतील तरीही घाबरू नये. कारण त्यापासून आपल्याला धोका नाही. परिसर स्वच्छ ठेवा एवढंच. कारण ‘कोरोना’ हा विषाणू ( Coronavirus )  फलहारी वटवाघळे पसरवत नाहीत आणि जी कपारी किंवा जुन्या घरात राहतात ती वटवाघळे सुद्धा कोरोना पसरवत नाहीत. फक्त जंगलातील गुहेतील काही ठराविक जातीची  वटवाघुळं ‘कोरोना’ पसरवितात. मात्र अशी एक सुद्धा केस भारतात नाही. ‘कोरोना’चा ( Coronavirus ) उगमस्थान हे चीन मधील वटवाघूळ खाणारी माणसचं आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यापुढील जीवनात तरी आपण परदेशी झाडं लावू नयेत. कारण प्रत्येक वन्यजीव हा स्थानिक गवत, झुडूप, वेली, वृक्ष यांवरच अवलंबून असतो. याचा विसर आपल्याला पडला. त्यामुळे अनेक वन्यजीव आपले घर सोडून इतरत्र पळू लागले आहेत. म्हणून कळकळीची विनंती आहे की, फक्त स्थानिक देशी झाडेच लावावीत. नाहीतर अनेक समस्या भविष्यात निर्माण होतील यात काहीच शंका नाही.

आपल्या गावातील छोटे ओढे, नद्या, पाणथळ ठिकाण, जुनी झाड, देवराया, शेतीच्या बांधावरील कडुलिंब ते बोर अशी काटेरी झाड जपुयात. हीच आपल्या जगाची श्रीमंती असेल. नाहीतर आपल्याएवढे भिकारी पृथ्वीवर कोणीही नसेल. आज एकमेकांना भेटताही येईना. उद्याच संकट काय असेल हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

Aside from Covid-19, these viruses also go from bats to humans

11 Amazing Facts on Indian Bats

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी