27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजीप चालकाकडून मुंबईच्या "त्या" कुटुंबीयांची फसवणूक, दोन दिवसापासून अडकले...!

जीप चालकाकडून मुंबईच्या “त्या” कुटुंबीयांची फसवणूक, दोन दिवसापासून अडकले…!

विनोद मोहिते / इस्लामपूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेकांना आपल्या गावाची ओढ लागली आहे. अशा कुटूंबाला हेरून मुंबईतीलच एका जीप चालकाने  इ पास असल्याचे सांगत कोल्हापूर जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर परवाना नाही असे सांगत गाडीला मागे पाठवले. रस्त्यावर उतरलेल्या “त्या” कुटूंबाला पोलिसांनी महामार्गावरील सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सोडले. तब्बल ४० तास हे कुटुंब महामार्गाच्या कडेला बसून आहे. त्यामुळे पीडित कुटुंबियांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

घणसोली मुंबई येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. यातील काही व्यक्ती खासगी कंपन्या मध्ये सुरक्षा रक्षक आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात त्यांचे मूळ गाव आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येने त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडे येण्यासाठी वाहनांची शोधाशोध झाली अन् एक पिकअप जीप त्यांना मिळाली. त्या गाडीच्या चालकाने  माझ्याकडे कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी परवाने आहेत. तुम्हाला गावाकडे सुखरूप सोडतो असे सांगितले. त्या कुटुंबातील पाच पुरुष आणि पाच महिला एक लहान मुलगी असे गुरुवारी रात्री जीपने मार्गस्थ झाले.

सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना चालकाने कोल्हापूर जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगत प्रवेश मिळवला. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करताना सर्व प्रवाशांना तपासणी साठी खाली उतरवले. याचवेळी आवश्यक परवाने नसल्याचे तेथील पोलीस व प्रशासनाच्या लक्षात आले. तेव्हा तो चालक जीपसह मुंबईच्या दिशेने परागंदा झाला. अन्  दहा जणांच्या एका कुटूंबाला फसवल्याचे स्पष्ट झाले. तातडीने पोलिसांनी या सर्वांना ४० किलोमीटरवर सांगली-सातारा सीमेवर कासेगाव येथील चेकपोस्टवर आणून सोडले.

जीप चालकाने मध्येच सोडल्याने या कुटुंबाची शुक्रवार पहाटे पासून चेकपोस्‍टवरच फरपड सुरू आहे. शनिवारची रात्रही त्यांना तिथेच काढावी लागणार आहे. कासेगाव पोलिसांनी त्यांचा इ-पास काढण्याची व्यवस्था केली आहे. तो रविवारी मिळेल असे या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

धारावी झोपडपट्टीतील २१ जणांनी सांगली जिल्ह्यात अवैधरित्या प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे. मुंबईपासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत लोक विनापरवाना कसा प्रवास करतात ? गावाकडे येणाऱ्या लोकांची फसवणूक करणाऱ्या वाहन चालकांची टोळी कार्यरत आहे का ? हे तपासणे पोलिसांच्या समोर आव्हान आहे. पुणे- बंगळूर महामार्गावर ठिकठिकाणी असणाऱ्या पोलिस चेक पोस्टचाही कारभार या निमित्ताने अधोरेखीत होत आहे.

खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे ते कुटुंब…

खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब १९९४ पासून वास्तव करीत आहेत. अनेक संकटे आली. पण कोरोनाच्या या महामारीत आम्ही तीन दिवस रस्त्यावर आहोत. जीप चालकाने २० हजार भाडे घेतले होते. माझ्याकडे परवाना आहे.आम्ही रोज जातो याला आम्ही बळी पडलो अशी उद्दिग्न भावना त्या व्यक्तीनी बोलून दाखवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी