31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र४८ तासांनंतरही हेरंब कुलकर्णींवरील हल्लेखोर फरार, मुख्यमंत्र्यांकडून हेरंब यांची विचारपूस

४८ तासांनंतरही हेरंब कुलकर्णींवरील हल्लेखोर फरार, मुख्यमंत्र्यांकडून हेरंब यांची विचारपूस

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण विषयातील तज्त्र हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरमधील रासनेनगर जवळील जोशी क्लासेसजवळ हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी जबर जखमी झाले आहेत. या हल्लाला ४८ तास उलटूनही कुणालाही अटक झालेली नाही. विशेष म्हणजे या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. तरीही पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकलेले नाही. हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणक्षेत्राविषयी तसेच इतर सामाजिक लेखन करताना अनेकदा सरकारवर टीका केली आहे. या हल्ल्यानंतर सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला तीन तरुणांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी समाजमाध्यमातून अधिक माहिती दिली आहे. हेरंब कुलकर्णी शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परतत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ते आजारी असल्याने सुनील कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून ते शाळेतून घरी येत होते. अहमदनगर येथे रासनेनगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला ४ टाके पडले आहेत. त्यांच्या डोक्यावर मारलेला दुसरा फटका सुनील कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे हेरंब कुलकर्णी बचावले. अन्यथा त्यांच्या डोक्याला आणखी जबर मार बसला असता. या हल्ल्यानंतर त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तसेच तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर ४८ तास उलटून गेले. पण पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही तर अजूनही सीसीटीव्ही फुटेजचा फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे, असे प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. या हल्ल्याचा माजी कुलगुरू आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुगणेकर यांनी निषेध केला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

कुलकर्णी यांची व्हायरल पोस्ट ४८ तासांनंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगेचच हेरंब कुलकर्णी यांच्याशी फोनवरून संवाद साधला, त्यांची विचारपूस केली आणि हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले.

हे ही वाचा

आरोग्य केंद्राला ‘सक्षमीकरणाचा डोस’ देण्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा

नुशरत युद्धभूमी इस्त्रायलमधून सुखरूप पोहोचली भारतात

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सव्वा वर्षात, सव्वाशे कोटींचे अर्थसहाय्य

 

शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे हेरंब कुलकुर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, आता सरांची तब्येत बरी असून ते झोपून आहेत, अशी माहिती प्रतिमा कुलकर्णी यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी