29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : कोरोनाबाधित वृध्देचा मृतदेह पाच दिवसांनी हॉस्पिटलच्याच शौचालयात सापडला!

Coronavirus : कोरोनाबाधित वृध्देचा मृतदेह पाच दिवसांनी हॉस्पिटलच्याच शौचालयात सापडला!

टीम लय भारी

जळगाव : मुंबईतील कोरोना रुग्ण (Coronavirus) हॉस्पिटलमधून गायब होत असल्याच्या घटना ताज्या असतानाच आता जळगावमधूनही एका ८२ वर्षीय कोरोनाबाधित आजी गायब झाल्याची घटना समोर आली आहे. जळगावातील कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिला शुक्रवारपासून (दि.५) बेपत्ता झाली होती. या बेपत्ता झालेल्या वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी कोविड रुग्णालयातील शौचालयात आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.

पाच दिवसांपासून हा मृतदेह शौचालयात पडून असताना ही बाब लक्षात न आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर शिक्कमोर्तब झाले आहे. याबात रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कोविड रुग्णालयाच भेट देवून संबधितांची कानउघाडणी केली.

भुसावळ येथिल ही वृध्द महिला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने भुसावळातील रेल्वे रुग्णालयात दाखल झाली होती. यानंतर त्या महिलेचा अहवाल पाझिटिव्ह आल्याने तिला जळगाव येथील शासकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ जूनपासून ही महिला बेपत्ता झाली होती. या प्रकरणी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी वृद्धेच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिस वृद्धेचा शोध घेत होते. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाने ही महिला पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या सर्व प्रकारामुळे कोविड रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था व कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

बुधवारी सकाळी ७ क्रमांकाच्या वॉडार्तील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचा-यांना बोलावल्यानंतर हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आतील दृश्य मन हेलावणारे होते. शौचालयात गेल्या पाच दिवसांपासून ही वृद्धा मरुन पडलेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून ओळख पटवली. ही वृद्धा पाच दिवसांपासून शौचालयात पडून होती. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, वॉर्डातील इतर रुग्ण यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पाच दिवसात शौचालयाची स्वच्छता देखील झाली नाही का? असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी