32 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमहाराष्ट्रवारकरी संप्रदायावर शोककळा... ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

वारकरी संप्रदायावर शोककळा… ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे आज गुरुवारी (26 ऑक्टोबर) पहाटे सहा वाजता निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील लाखो लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर या त्यांच्या दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (27 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे अनेकांंना धक्का बसला असून महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला होता.त्यांचे मुळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होते. पुढे कीर्तनाच्या मध्यमातुन त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळाले. ते नवी मुंबईतील नेरूळ येथे वास्तव्यास होते. त्यांनी वकिलीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील एक प्रमुख फड म्हणून सातारकर फडाला ओळखले जाते. प्रसिद्ध प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली होती. आजही त्यांच्या मुली आणि नातू ही परंपरा जोपासत आहेत.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज गुरुवारी (26 ऑक्टोबर) नेरूळ जिमखानासमोरील विठ्ठल मंदिराच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शुक्रवारी (27 ऑक्टोबर) नेरूळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

हे ही वाचा 

धनगर मेळावा जेजुरीत धडकणार; ‘या’ मुद्यांवर चर्चा होणार

नवी मुंबईकरांचा मेट्रोप्रवास पुन्हा लांबणीवर.. वडेट्टीवारांचे सरकारवर टिकास्त्र

डॉक्टर नरेंद्र जाधव ‘भीमभाष्य’मधून मांडतात बाबासाहेबांची गाथा

बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा महाराजांच्या निधनावर शोक व्यक्त करीत किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव अशा शब्दांत श्रद्धांजलि वाहीली आहे.

तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील श्रद्धांजलि देत, “ज्यांच्या कीर्तनाची ख्याती राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात होती अशा थोर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली” असे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी