30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीय कामगारांची रेल्वे स्थानकांवर मोठया प्रमाणात गर्दी; रेल्वेचा परप्रांतीयांना सल्ला, पॅनिक होऊ...

परप्रांतीय कामगारांची रेल्वे स्थानकांवर मोठया प्रमाणात गर्दी; रेल्वेचा परप्रांतीयांना सल्ला, पॅनिक होऊ नका!

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर काही दिवासांपूर्वी कडक निर्बंध लागू केले होते. परंतु तरी सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक आहे म्हणून त्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. हे निर्बंध जरी १ मे पर्यंत असणार असले तरी त्यात वाढ होण्याची भीती असल्याने हातावर पोट असलेले कामगार भयभीत झाले आहेत. त्यामुळे या कामगारांनी चंबूगबाळे आवरत थेट रेल्वे स्थानक गाठले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. अचानक झालेल्या या गर्दीमुळे कामगार अधिकच भयभीत झाले असून रेल्वेने पॅनिक होऊ नका, गाड्या सुरूच राहतील. सर्वांना प्रवास करता येईल, असे आवाहन केले आहे.

मध्ये रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी एम. सुतार यांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी पॅनिक होऊ नये. रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये. रेल्वे वेटिंग लिस्टवर लक्ष ठेवून आहेत. जशी गरज असेल तशा अतिरिक्त स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल. गाडी सुटण्याच्या ९० मिनिटे आधीच स्टेशनवर या, विनाकारण स्टेशनवर गर्दी करू नका, असे आवाहन सुतार यांनी प्रवाशांना केले आहे.

२३० समर स्पेशल सोडणार

आतापर्यंत मध्य रेल्वेने २३० समर स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. त्याशिवाय आम्ही अधिक अतिरिक्त गाड्या सोडणार आहोत. या सर्व स्पेशल ट्रेनमधून केवळ कोविड नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कन्फर्म तिकिट असणाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उन्हाळा असल्याने रेल्वे स्थानकांवर सामान्य गर्दी आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका. लोकांनी पॅनिक होऊ नये. दरवर्षी उन्हाळ्यात अशी गर्दी रेल्वे स्थानकात होत असते. आम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. लोकांनी त्रस्त होऊ नये. अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रेन बंद होणार नाही

ट्रेन बंद होणार नाहीत किंवा गाड्या कमी करण्यात येणार नाही. उलट गरज पडल्यास अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत, असे ही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या भीतीने अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तातडीने ही माहिती जारी केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनीही गाड्यांची कपात केली जाणार नाही आणि मागणी वाढल्यासा अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार असल्याचे प्रवाशांना आश्वासन दिले होते. प्रवाशांकडून प्रवास करण्यासाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवण्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. प्रवाशांकडून असा कोणताही रिपोर्ट मागण्यात येणार नाही. फक्त प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करूनच प्रवास करणे अपेक्षित आहे, असे ही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी

दरम्यान, महाराष्ट्रात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे पर्यंत १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४४ कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली असून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी