30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रMaitreya Scam Update : 'मैत्रेय' वरून जनआक्रोश वाढला, राज्यभर धरणे आंदोलन करणार

Maitreya Scam Update : ‘मैत्रेय’ वरून जनआक्रोश वाढला, राज्यभर धरणे आंदोलन करणार

अनेक वर्षांपासून मैत्रेयच्या विरोधात लढा पुकारणारे अनेकजण आता आणखी आक्रमक झाले असून  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्यभर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे न्यायासाठी हा लढा पुन्हा आक्राळविक्राळ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील शहरी आणि ग्रामिण भागीतील नागरिकांना गंडा घालून ‘मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड’ या कंपनीने प्रचंड माया जमवली आणि कोणाला काही कळायच्या आत काढता पाय घेत धूम ठोकली. महाराष्ट्रातील हजारो नव्हे तर लाखो लोकांचे यात अतोनात आर्थिक नुकसान झाले परंतु अद्याप त्यांना योग्य तो न्याय मिळू शकलेला नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरीही आतापर्यंत न्यायालयाने दिलेल्या आदेशांची सुद्धा वेळेत अंमलबजावणी न झाल्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस जटील बनत चालले आहे. अनेक वर्षांपासून मैत्रेयच्या विरोधात लढा पुकारणारे अनेकजण आता आणखी आक्रमक झाले असून  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्यभर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे न्यायासाठी हा लढा पुन्हा आक्राळविक्राळ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशन कडून सर्व मैत्रेय पीडित प्रतिनिधींसाठी एक आव्हानाचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून ‘मैत्रेय’ प्रकरणातील मागणीसाठी पिडीत प्रतिनिधींकडून प्रत्येक तालुका व जिल्हा ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून सर्व पीडित ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या परताव्याची रक्कम सत्वर वाटप व्हावी अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदने देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Memes : जाणून घ्या ! ‘मीम्स’चा इतिहास

Nashik News : काय सांगता! वकील विकतोय बिबट्याची कातडी

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

हे धरणे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात करण्यात येणार असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात येणार आहे. सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लय भारी टीमने धुळे येथील मैत्रेय पिडीत सदस्य नानासाहेब पाटील यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी पाटील म्हणाले, हे धरणे आंदोलन त्या त्या जिल्ह्यातील गांधीजींच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे. मैत्रेय पिडीत ग्राहक किमान सहा वर्षांपासून प्रतिक्षेत आहेत आणि जवळपास ३२ जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. सर्वच ठिकाणी हे गुन्हे प्रलंबित आहेत असे म्हणून न्यायाअभावी होणाऱ्या लोकांच्या फरफटीची खंत व्यक्त केली.

नानासाहेब पाटील पुढे म्हणाले, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आलेला आहे, परंतु मैत्रेयच्या मालमत्तेच्या विक्रीची ऑर्डर दिलेली असताना सुद्धा त्याबाबत योग्य न्याय झालेला नाही त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि यासाठी एका विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी अशी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या ताब्यातील ज्या मालमत्ता आहेत त्या तातडीने निकाली लावायला हव्यात, त्याची विक्री व्हायला हवी म्हणजे लोकांना गुंतवलेल्या परताव्याची रक्कम मिळू शकेल. फसवणूक झालेल्यांमध्ये 70 टक्के आकडा हा महिलांचा असून त्या धुणी – भांडी करण्याचे काम करतात. दरम्यान या फसवणुकीने त्यांचे संसारच उधवस्त झाले असून अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, म्हणूनच या संदर्भात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत, असे नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

केवळ एक- दोन नाही तर तब्बल 32 जिल्ह्यांमध्ये मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड या कंपनीने दाम-दुप्पट आणि मुदत ठेवीला 11 टक्के व्याजदराचे आमिष दाखवत नागरिकांना सपशेल लुटले आहे. मैत्रेयने आमिष दाखवताच अनेक सर्वसामान्य आर्थिक विवंचनेतून झटपट बाहेर पडता येईल म्हणून भाळून गेले. लोकांनी कोणताच विचार न करता मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, कोणी आयुष्यभराची कमाई असे सगळेच पैसे दामदुप्पटीने मिळतील म्हणून मैत्रेयच्या स्वाधिन केले पण अखेर एक रुपया सुद्धा त्यांच्या हाती लागला नाही, त्यामुळे हे पैसे नेमकं कोण आणि कसे परत करणार असा प्रश्न नागरिकांसमोर घर करून बसला आहे. आर्थिक फसवणूकीत पोळलेले सगळेचजण अजूनही न्यायदेवता आणि प्रशासन यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने डोळे लावून बसलेले दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी