31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्राने सहकार्य केल्यामुळे राज ठाकरेंकडून मोदींचे आभार

केंद्राने सहकार्य केल्यामुळे राज ठाकरेंकडून मोदींचे आभार

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. राज्यात कोरोनाचे संकट असताना दुसरे संकट निर्माण झाले ते म्हणजे कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला. केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असेच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

१०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी 

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे लिहिले होते. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे राज ठाकरेंनी नमूद केले होते.

केंद्र सरकारकडून मुंबईच्या हाफकिन संस्थेत लसनिर्मितीस परवानगी

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. केंद्राच्या या परवानगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे, तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी