रस्ते अपघात टाळण्यासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. विशेषतः व्यसनापासून पूर्णपणे दूर रहावे असे आवाहन आडगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक राकेश हांडे यांनी चालकांना केले आहे. नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टार्मिनल आडगाव येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा वाहतूक अभियान २०२४ अंतर्गत वाहतूक सुरक्षा शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
नाशिक शहर वाहतूक पोलीस व परिवाहन विभाग नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आरटीओ प्रविण सोनवणे,वाहतूक नियमांचे शाळा कॉलेज मध्ये धडे देणारे पोलीस सचिन जाधव, नाशिक ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, पदाधिकारी संजु तोडी, रामभाऊ सूर्यवंशी, सी.बी.शर्मा, सुनील ढाने, सुभाष जांगडा, दीपक ढिकले, भगवान कटीरा, दलजीत मेहता, महेंद्र राजपूत, कृष्ण बेनिवाल, अशोक पवार, महावीर शर्मा, सियाराम शर्मा, सदाशिव पवार, बजरंग शर्मा, शंकर धनावडे, सिद्धेश्वर साळुंके, सुभाष वाजे, दलबीर प्रधान, बिपीन पांडे, संजय बोरा, कैलास शिंदे,बापु ताकाटे, अमरनाथ पांडे, बळीराम कदम, नरेश बन्सल, अनिल कलंत्री, सुरेश शर्मा, अमोल चव्हान, नाना पाटीलयांच्यासह पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरिक्षक राकेश हांडे पुढे म्हणाले की, वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रक चालकांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत अतिशय मोलाचे योगदान आहे. चालकांचा वाहतूक नियमांचा आणि कायद्याचा पूर्ण अभ्यास असायला हवा. जनेकरून महामार्गावर कुठल्याही यंत्रणेकडून त्रास होत असेल तर याबाबत ते आवाज उठवू शकतात. चालकांनी यासाठी सोशल मिडीयाचा देखील चांगला उपयोग करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी सबंधित यंत्रणेला माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्ते अपघात हा अतिशय चिंतेचा विषय आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच व्यसनापासून दूर राहून आपल कर्तव्य बजवावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड म्हणाले की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही संघटना वाहतूकदार आणि चालकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवीत असते. महामार्गावर प्रति शंभर किलोमीटर अंतरावर चालकांना सर्व सुविधांयुक्त विश्रांतीगृह असावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात महामार्गावर चालकांसाठी विश्रांतीगृह उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे. वाहतूक क्षेत्रासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्यामुळे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शासनाचे अभिनंदन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित चालकांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यांना वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.