29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र'त्या' जाहिराती पाहून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालताहेत - नारायण राणे

‘त्या’ जाहिराती पाहून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालताहेत – नारायण राणे

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिराती ही निव्वळ धूळफेक आहे. त्या जाहिराती बघून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालत आहेत, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे.

कोकणातील चक्रीवादळाच्या समस्येवर एक रूपयाही आला नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. ठाकरे आणि पवार यांच्या आश्वासनांना काही किंमत नाही. सरकारने आता केवळ आश्वासन न देता, प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. केंद्र आणि मुंबई महापालिकेच्या अनेक योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात केलाय. हे करता येतं का? याचे पैसे तुम्ही देणार आहेत का?” असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

सरकार कोरोनाबद्दल बोलत आहेत, पण देशातील सर्वाधिक कोरोना हॅाटस्पॅाट हे महाराष्ट्रात आहेत. देशातल्या 10 जिल्ह्यांमधील 8 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात पुन्हा लॅाकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री बोलत आहेत. देशातील रूग्णांच्या तुलनेत 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असंही नारायण राणे यांनी नमूद केलं. मुकेश अंबानींसारख्या उद्योगपतीला धमक्या दिल्या जातात, सुपारी दिली जाते आणि त्याच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडते. एका पोलीस अधिका-याची बाजू मुख्यमंत्री घेतात. सचिन वाझेची मुख्यमंत्र्यांना भरपूर काळजी आहे. याच्याशिवाय आपले संरक्षण कोण करणार नाही असेच त्यांना वाटतेय. दिशा सालिअनवर बलात्कार झाला, हत्या झाली, तरी सरकार कोणाला काही करत नाही, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले आहे.

राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. तो राज्याचा नसून फक्त पुणे केंद्रीत अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली. नारायण राणे म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवून दाखवले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठराविक ठिकाणी सरकारने खर्च केला आहे. पुणे शहराच्या रस्त्यांसाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईतील सागरी मार्गासाठी काहीच दिले नाही. अर्थसंकल्पामध्ये 1 लाख कोटींची तूट आहे. त्यामुळे ती कशी भरुन काढणार, याबाबत सरकारने काही स्पष्ट केलेले नाही. अधिवेशनात अधिका-यांनी दिलेली आकडेवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाचून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी