31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रअग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन् भाजपमध्ये जुंपली

अग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन् भाजपमध्ये जुंपली

लडाखमधील सियाचीन येथे तैनात असलेले भारतीय सैन्याचे जवान अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना वीरमरण आले आहे. बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई येथील रहिवासी असलेल्या शहिद गवते यांचे वय केवळ 22 वर्षे होते. सियाचीन येथे लाइन ऑफ ड्यूटीवर ते तैनात असताना त्यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या फायर अँड कॉर्प्सचे ते भाग होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी, (23 ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु, आता यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत.

शहिद जवान अक्षय लक्ष्मण गवते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात सामील झाले होते. काराकोरम पर्वतरांगेतील 20 हजार फुट उंचीवर असलेल्या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे त्यांची नियुक्ती झाली होती. रविवारी, (22 ऑक्टोबर) त्यांचे पार्थिव शरीर विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले.

शहीद जवान अक्षय लक्ष्मण गवते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात सामील झाले असल्यामुळे त्यांना पेन्शन तसेच इतर सरकारी लाभ मिळणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ वर (पूर्वीचे ट्विटर} केला होता. त्यावर भाजपाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ वर लिहिले, “जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपुत्र ‘अग्नीवीर’ अक्षय लक्ष्मण गवाते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! दुर्दैवाची बाब म्हणजे अग्नीवीर असल्याने देशासाठी बलिदान देऊनही गवाते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्नीवीर शहीद झाल्यानंतरही त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्नीवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहिजे.”

भाजपने दिले प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरुन रोहित पवार यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देण्यात आले. “शहिदांच्या बलिदानाचा उपहास करण्याचे तुच्छ राजकारण, कशाला करता? कधी तरी राजकीय बुरखा उतरवून समाजाकडे पाहा. आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आपण केवळ हेतू परस्पर चुकीची माहिती समाजापुढे आणून युवकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात. भारतीय सैन्याकडून देण्यात आलेली अधिकृत माहिती एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण एकदा तरी वाचण्याचे कष्ट घ्यायला हवे होते. पण, तुमच्या नीच मानसिकतेत ते बसत नाही. खरं तर शहिदांची तुलना पैसे, पेन्शनने करणे योग्य नाही. पण, रोहित पवार सारखे अल्पबुद्धी राजकारणी तरुणांची दिशाभूल करत आहेत, म्हणून सत्य मांडणे देखील गरजेचं आहे.” पुढे शहीद अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीची यादी त्यांनी सादर केली.


शहीद गवते यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारा निधी

भारतीय सैन्याकडून आलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे शहीद अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारा निधी खालीलप्रमाणे,

  • नॉन कॉट्रिब्युटरी इन्शुरन्स रक्कम 48 लाख रु.
  • अग्निवीरने (30%) योगदान दिलेले सेवा निधी, सरकारच्या समान योगदानासह, आणि त्यावर व्याज.
  • ₹ 44 लाख सानुग्रह.
  • मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचा देय (तात्काळ प्रकरणात ₹13 लाखांपेक्षा जास्त).
  • आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडमधून 8 लाखांचा निधी
  • AWWA कडून तात्काळ 30 हजारांची आर्थिक मदत
  • एकूण मदत १ कोटी १३ लाख इतकी दिली जाईल

हे ही वाचा 

‘अग्नीवीर’ ही कंत्राटी भरतीची मातृयोजना; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर आरोप

चंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

‘मराठा-कुणबी’ संदर्भात काय बोलले रामदास कदम?

“या निधीतून झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही, मात्र शहीद सैनिकाच्या कुटुंबाला आधार म्हणून हा निधी दिला जातो. महाराष्ट्राच्या शहीद सुपुत्राने अगदी कमी वयात जीवाची तमा न बाळगता देशासाठी बलिदान दिले. मात्र तुम्हाला अगदी खालच्या थराला जाऊन राजकारण करायची सवय लागली आहे याची प्रचिती महाराष्ट्राला आज पुन्हा आली.’ अशी टीका रोहित पवारांवर करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी