28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयचंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

चंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाभाडे काढले आहेत. याला निमित्त ठरले आहे ते कंत्राटी भरती प्रकरणाचे. सरकारमधील कंत्राटी भरतीचा जीआर महायुती सरकारने दोन दिवसांपूर्वी रद्द केला. पण त्यावरून सुरू झालेले महाभारत काही संपलेले नाही. हे उद्धव ठाकरे सरकार आणि शरद पवार यांच्या आशीर्वादाचे पाप असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर महायुती सरकारने त्यांचे पाप महाविकास आघाडीवर फोडू नये, असा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागण्या संदर्भात मोठे वक्तव्य केले होते. त्यावरून शरद पवार यांनी त्यांचे वाभाडे काढले आहेत.

राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला असला तरी त्याचे कवित्व अजून संपलेले नाही. आताही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून कंत्राटी भरतीचे पाप शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर ‘जी व्यक्ती असं बोलत आहे त्या व्यक्तीचं जनमानसातील स्थान काय आहे’ असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, या गृहस्थांचे समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिले नव्हते. ज्या व्यक्तीला त्यांचा पक्ष तिकीट देत नाही, ज्याला त्यांचा पक्ष तिकीट देण्याच्याही लायकीचा मानत नाही, त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.

शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपमधील काही नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मदतीला धावून गेले आहेत. शिवाय दोन्ही बाजूंनी ट्विटर वॉरदेखील सुरू झाले आहे. दरम्यान, सरकारमधील कंत्राटी भरतीवरून  विरोधकांनी ‘माफी मागा’ असे आंदोलन भाजपने राज्यात सुरू केले आहे. राज्यात  कंत्राटी भरतीची सुरुवात महाविकास आघाडी सरकारने केली असून त्याचे खापर महायुती सरकार फोडले जात असल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत.

हे ही वाचा

फडणवीस खोटारडे, ललित पाटीलवरून राऊतांचा पलटवार

डॉ. आंबेडकरांच्या ‘अर्थपूर्ण’ लिखाणाची जगाकडून दखल – शरद पवार

‘अग्नीवीर’ ही कंत्राटी भरतीची मातृयोजना; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर आरोप

बारामतीचे महत्त्व

चंद्रशेखर बावनकुळे वारंवार बारामतीवर बोलत आहेत. कारण बातमी छापावी आणि लोकांनी वाचावी असे त्यांना वाटते. जे पक्षाला तिकीट द्यायलाही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काही कारण नाही, असा टोला शरद पवार यांनी पुन्हा बावनकुळेंना लगावला.

तुमच्या पक्षाची चिंता करा – प्रवीण दरेकर
दरम्यान, शरद पवारांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांच्या पक्षाचे मोठे मोठे नेते त्यांना का सोडून गेले, त्यांनी पक्ष का सोडला, याचा विचार करावा, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी