28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयपडळकर सरकारवर घसरले, धनगर आरक्षणासाठी काय केले?

पडळकर सरकारवर घसरले, धनगर आरक्षणासाठी काय केले?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणासाठी आरेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत पडळकर यांनी शरद पवारांचा पुन्हा एकदा लबाड लांडगा असा उल्लेख केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी याआधीही शरद पवारांवर अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली होती. आज पुन्हा एकदा पडळकरांनी पवारांवर टीकेची तोफ डागताना लबाड लांडगे असा उल्लेख केला. त्यामुळे पडळकरांच्या या टीकेला शरद पवार गटाकडून उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पडळकरांचा सरकारला घरचा आहेर

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) प्रमाणपत्र द्यावे, ही धनगर समाजाची मुख्य मागणी आहे. त्यासाठी २१ सप्टेंबर रोजी सरकारसोबत बैठक झाली होती. त्यावेळी मी सरकारला अनेक जीआर दिले. तरीही तेव्हापासून सरकारने धनगर आरक्षणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही, असा घराचा आहेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला. वास्तविक सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेचे समर्थन केले पण त्यानंतर साधी समितीही स्थापन केली नाही. आता तरी सरकारने समिती स्थापन करून इतर राज्यांमध्ये पाठवावी, अशी आग्रही मागणी गोपीचंद पडळकर यांनी या सभेत केली. सरकारच्या हातात अजून २९ दिवस आहेत. तोपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

पडळकरांनी पुन्हा पवारांना डिवचले

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याचवेळी शरद पवारांचा पुन्हा एकदा लबाड लांडगा असा उल्लेख पडळकरांनी केला. ‘आरक्षणाला पहिल्यांदा लबाड लांडग्याने विरोध केला. त्यांना मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पक्षातून पुतण्या फुटला आणि आता हे भुजबळांच्या मागे लागलेत’, अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली.

हे ही वाचा

अखेर जरांगेंचं ठरलं, आता आरपारची लढाई

चंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

ललित पाटीलला आज नाशिकमध्ये का नेले होते?

दरम्यान, धनगर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. धनगर समाजाइतका कुणावरही अन्याय झालेला नाही, असा दावा पडळकरांनी केला. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय राहायचे नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी या सभेत केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी