27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजी भिडे आले सरकारच्या मदतीला धावुन, मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचे केले...

संभाजी भिडे आले सरकारच्या मदतीला धावुन, मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचे केले आवाहन!

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचा आज मंगळवारी, (12 ऑगस्ट) उपोषणाचा 14 वा दिवस आहे. जोपर्यंत राज्य सरकार आरक्षणाचा जीआर काढत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. गेल्या चौदा दिवसांत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता. आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रमुख संभाजी भिडे यांनीदेखील आंतरवली सरटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. संभाजी भिडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून मनोज जरांगे पाटील याना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे, राज्य सरकारने उपोषण रोखण्यासाठी आता संभाजी भिडे यांचा आधार घेतला आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हे आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकार जरांगे पाटील यांची मनधरणी करीत आहेत, राज्य सरकारचे शिष्टमंडळ सतत जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती करीत आहे. पण सरकारला हे आंदोलन रोखण्यात अपेक्षित यश मिळत नाही आहे. आता, संभाजी भिडे यांच्या प्रयत्नांमुळे मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे?

यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, “मी ज्ञानोबा-तुकाराम, एकनाथ-नामदेव, सावता माळी-गोरा कुंभार, विठ्ठल रखुमाई यांचा निरोप घेऊन आलो आहे. मी राजकारणी नाही. आम्ही देश, देव, धर्मासाठी काम करणारे आम्ही तुमच्यासोबत आहोत. तेही ही समस्या संपेपर्यंत. आम्ही केवळ देखाव्यासाठी आलेलो नाही.”

“मराठा समाजाला पाहिजे तसं आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. तुम्ही जे करताय ते 101 टक्के योग्य करता आहात. हा प्रश्न आता राजकारण्यांच्या हातात आहे आणि जोपर्यंत त्यांच्या हातात हा प्रश्न आहे, तोपर्यंत शेवाळावरून चालण्यासारखं आहे” असे भिडे यांनी जरांगे पाटील यांना सांगितले.

यावेळी संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत म्हणाले, “एक चांगली गोष्ट आहे की, आता जे राजकारणी सत्तेवर बसले आहेत त्यात एकनाथराव शिंदे अजिबात लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तरी काळजी असलेला माणूस आहे.”

“हे आंदोलन तुम्ही जिवाच्या आकांताने चालवलं, यात दुमत नाही. तुम्हाला उपदेश करायला आलेलो नाही. तुम्ही करताहेत ती धर्माची समस्या आहे. तुमच्या तपश्चर्येला शंभर टक्के यश येणार आहे. तुम्ही फक्त ते राजकारणी आहेत म्हणून बिचकू नका. जो शब्द ते देतील, तो पाळून घेण्याचं काम माझ्याकडे सोपवा. एक घाव दोन तुकडे अशी ही लढाई नाही. तुमचा जो आग्रह आहे, त्या बाजूने ही लढाई यशस्वी होईल. तुम्ही हे उपोषण मोठ्या मनाने थांबवा. मी तुम्हाला नाउमेद करायला आलेलो नाही. या उपोषणाचा जो उद्देश आहे, तो यशस्वी होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. अजिबात शंका घेऊ नका. माझी कळकळीची प्रार्थना आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं. लढा थांबवू नये. हा जिजा माऊलींचा, शहाजीराजेंचा तुम्हाला आलेला निरोप आहे, असं समजून तुम्ही हे आंदोलन थांबवावं”, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महोज जरांगे पाटील यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा 

भीमाशंकरच्या सुविधासाठी १४८ कोटींच्या आराखड्यातील ६८ कोटी खर्च – मुख्यमंत्री शिंदे

मोदी सरकारच्या काळात कोणी सुखी नाही, फक्त एक व्यक्ती सुखी; नाना पटोलेंचा घणाघात

‘बार्टी’च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सांगितले, “कुणीही आलं तरी त्याचा पाठिंबा स्विकारणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे भिडे यांचा पाठिंबा आम्ही स्विकारत आहोत. कुणीही येऊन आम्हाला पाठिंबा देतो तेव्हा ताकद वाढते. तसं संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिल्यानेही आमची ताकद वाढली आहे. पण आम्हाला भावना महत्वाच्या नाहीत. तर आरक्षण महत्वाचं आहे. थोड्याच वेळात आम्ही आमची भूमिका जाहीर करू.”

आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी