28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमंत्रालयVideo : मंत्रालयात घुसले गटाराचे पाणी, महापालिका – मेट्रोने केली PWD ची...

Video : मंत्रालयात घुसले गटाराचे पाणी, महापालिका – मेट्रोने केली PWD ची फजिती ! पावसाळ्याच्या जय्यत तयारीवर फेरले पाणी !

पावसाळा हाता तोंडावर आला आहे. मुंबईत कोसळधारा कधीही धुमाकूळ घालतील. मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून महापालिका, सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करणाऱ्या योजना आखल्या जात आहेत. पण इतका चुराडा करूनही पावसाळी तयारीच्या तिनतेरा वाजल्याचे गंभीर उदाहरण समोर आले आहे. गटाराचे पाणी चक्क मंत्रालयात घुसले आहे. मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या तळमजल्यावर हे पाणी साचले आहे. वऱ्हांड्यातच पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. दुर्गंधयुक्त पाणी असल्याने त्यातून रोगराई पसरण्याचीही भिती आहे.

सध्या कोरडा ठाक उन्हाळा आहे. तरीही गटाराचे पाणी मंत्रालयात घुसले आहे, पण पाऊस धो धो कोसळू लागल्यानंतर काय अवस्था होऊ शकेल याची चुणूकच या छोट्या घटनेने दाखविली आहे. हे पाणी कुठून घुसले याचा शोध ‘लय भारी’ने घेतला असता गंभीर प्रकार समोर आला. सध्या मुंबईभर मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. विधानभवन – मंत्रालय परिसरात सुद्धा मेट्रो रेल्वे क्रमांक तीनचे काम सुरू आहे. कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. या कामामुळे मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्या गेल्या आहेत. परिणामी मंत्रालयाच्या तळमजल्यावर हे घाणेरडे पाणी साठले आहे.

या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अब्रुचे मात्र पुरते धिंडवडे निघाले आहेत. मंत्रालयात दुरूस्तीच्या नावावर पीडब्ल्यूडीचे अधिकारी करोडो रुपये खर्च करीत असतात. मंत्र्याच्या दालनापासून ते शौचालये, वऱ्हांडे अशा ठिकाणी वांरवार दुरूस्ती कामे दाखवून पैसे हडपले जातात. यातील बरीच कामे तर केवळ कागदावरच केलेली असतात.
मंत्री, सचिव यांना आपले दालन चकाचक हवे असते. ही चकाचक कामे करण्यासाठी पीडब्ल्यूडीचे अधिकारी सुद्धा आतूर असतात. कारण छटाकभर काम करून हातभर मलिदा ओरपण्याची संधी मिळते. मंत्रालयातील कामांसाठी निधीही तत्परतेने मंजूर केला जातो. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसाठी हे घबाडच असते.

मंत्रालय व परिसरातील सरकारी इमारतींची बांधकामे व दुरूस्तीच्या कामांची जबाबदारी पीडब्ल्यूडीच्या इलाखा शहर विभागाच्या अखत्यारित येते. हा इलाखा शहर विभाग अधिकाऱ्यांसाठी मलईदार समजला जातो. या ठिकाणी बदली मिळण्यासाठी अक्षरश: लिलावाप्रमाणे बोली लावल्या जातात. आता करोडो रूपयांची उधळपट्टी करून सुद्धा मंत्रालयातील कामे किती बोगस आहेत, हे मेट्रोच्या कामाने दाखवून दिले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री शंभूराज यांचे आजोबाप्रेम; बाळासाहेब देसाई यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे राजभवनावर प्रकाशन !

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी; तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियु्क्ती

देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र – शरद पवार 

याबाबत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमच्या कामात काहीही उणिवा नाहीत. महापालिका व मेट्रोमुळे हा प्रकार घडला आहे. मंत्रालय परिसरात पंप लावून सतत पाणी उपसण्याचे काम महापालिका व मेट्रो करीत असते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मंत्रालयात पाणी घुसल्याची कबूली या अधिकाऱ्यांनी दिली.

तीन वर्षांपूर्वी मेट्रोमुळे मंत्रालय परिसर तुंबला होता
मेट्रोच्या कामामुळे तीन वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईत पाणीच पाणी झाले होते. मंत्रालय परिसरात दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. यंदाही मेट्रोचे काम ऐन पावसाळ्यात संटक घेवून येणार की काय अशी भिती मंत्रालयातील ताज्या प्रकारामुळे निर्माण झाली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी