28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबईआणखी एका रुग्णालयात भीषण अपघात, १३ जणांचा बळी

आणखी एका रुग्णालयात भीषण अपघात, १३ जणांचा बळी

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी रुग्णांचा जीवावर बेतल्याची आणखी एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांना प्राण गमवावे लागले, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. विरारमधील दुर्घटनेने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९०  जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३  जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

वल्लभ कोव्हिड रुग्णालयात AC च्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, अशीही माहिती समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार-नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया

विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालयातील सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट झाला, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिली. त्यावेळी आयसीयूत १७ रुग्ण होते. त्यातील १३  जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली, असे ही ठाकूर यांनी सांगितले.

रुग्णालयात एकूण ९० रुग्ण उपचार घेत होते. फायर ऑडिट वगैरे पुढचा प्रश्न आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणे किंवा मदत करणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आत मधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात १३ जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे,  अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी