31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
HomeमुंबईEknath Shinde : शिंदेगटातील शिवसेनापक्षप्रमुख 'एकनाथ शिंदे'च!

Eknath Shinde : शिंदेगटातील शिवसेनापक्षप्रमुख ‘एकनाथ शिंदे’च!

काहीच वेळात या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे परंतु त्या आधीच शिंदे गटातील शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात जात बंड पुकारले आणि शिवसेनेला पुरती खिळखिळी करून टाकली. शिवसेनेतील मोठे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक आणि अनेक शिवसैनिकांनी शिंदेंना पाठींबा दर्शवत ठाकरेंकडे सपशेल पाठ फिरवली. या अभुतपुर्व बंडामध्ये एकनाथ शिंदेंना भाजपची साथ मिळाली त्यामुळे शिंदे गट आणखी जोमाने आपली मुळे घट्ट करू लागला आहे. या संपुर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर बसलेल्या शिंदे गटाला आपणच शिवसेना असल्याचे वाटू लागल्याने आपण खरी शिवसेना असा दावा सुरू झाला आणि हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. दरम्यान, काहीच वेळात या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे परंतु त्या आधीच शिंदे गटातील शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज माध्यमांशी बोलताना एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 40 आमदार आणि 16 शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आला, असे म्हणून शिंदे गटाची भूमिका न्यायालयाचा निकाल येण्याआधीच सत्तारांनी स्पष्ट केली त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट – सूलट चर्चा सुरू झाली आहे, शिवसेनेच्या गोटात ठाकरे गटामध्ये सुद्धा एकच गोंधळ उडालेला आहे.

हे सुद्धा वाचा…

Amrita Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिले ‘झाडू’ला प्रोत्साहन

INDvsSA T20I : भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आफ्रिका संघाने घेतला खास व्यक्तीचा आशिर्वाद

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

दरम्यान, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला रामराम करत वेगळाच शिंदे गट स्थापन करत शिंदे गट स्वतःलाच खरी शिवसेना म्हणू लागले आहेत, त्यामुळे हा वादंग दिवसेंदिवस चिघळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या अनेक दाव्यानंतर त्यांच्या गटाचा शिवसेना पक्षप्रमुख कोण यावर आज पहिल्यांदाच भाष्य करण्यात आलेले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली आणि त्यावेळी शिंदे गटाची नेमकी भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख केला.

यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शिंदे गटाचे सर्व खासदार, आमदार जिल्हाप्रमुख आणि पदअधिकाऱ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सत्तारांनी यावेळी सांगितले.

शिवसेना अंतर्गत चाललेल्या या वादावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. वाद दोन्ही गटाचा असला तरीही त्यापैकी एकालाच कोणाला तरी त्याचा मालकी हक्क मिळणार, कोण खरा वारसदार ठरणार, किंवा शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवणार का असे एक ना अनेक प्रश्न वाद निर्माण करीत आहेत त्यामुळे अंतिम निष्कर्षासाठी ही न्यायालयीन प्रक्रिया अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी