27 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमुंबईराज ठाकरेंनी टोलवरून उपसली तलवार, थेट मुख्यमंत्री शिंदेंना केला सवाल

राज ठाकरेंनी टोलवरून उपसली तलवार, थेट मुख्यमंत्री शिंदेंना केला सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा टोलवरून आक्रमक झाले आहेत. मुंबईत प्रवेश करण्यासाठी पुन्हा टोलदरवाढ करण्यात आली आहे. ठाणे टोलनाक्याने 1 ऑक्टोबरपासून दरवाढ केल्यानंतर मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव या टोलदरवाढीच्या विरोधात चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. पण त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे आता हा प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी हाती घेतल्यामुळे तडीस जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील. त्यामुळे टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे सरकारच्या विरोधात उभे राहिल्याचे चित्र आहे. तुर्तास त्यांनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासून टोलनाक्यांविरोध्यात आवाज उठवला होता. त्यांच्या आंदोलनामुळे अनेक टोलनाके बंद झाल्याचाही दावा मनसेकडून करण्यात आला आहे. असे असताना आता पुन्हा टोलदरवाढ करण्यात आली आहे. याविरोधात खुद्द राज ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत.

यावेळी राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. टोलविरोधात पिटीशन दाखल केली होती. ती त्यांनी का मागे घेतली? कुणाच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंनी ती मागे घेतली? असे सवाल उपस्थित केले. राज ठाकरेंनी ठाणे टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना एक पत्रक पाठवण्यात आले, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

राज ठाकरे म्हणाले, मनसेने टोलनाक्यांविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. राज्यभरातील अधिकृत आणि अनधिकृत 65 ते 67 टोलनाके बंद केल्याचाही दावा त्यांनी केला. इतकेच नव्हे तर गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने त्यांच्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. त्याचे काय झाले हा प्रश्न त्यांना कोणी विचारत नाही. पण आम्हाला मात्र, टोल आंदोलनाचे काय झाले, असा प्रश्न वारंवार विचारला जातो.

हेही वाचा 

कुणबी आणि मराठे एकच? जरांगे पाटलांचा आकडेवारीसह दावा

“साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच…” जितेंद्र आव्हाड भावूक; ट्वीट करत दिली माहिती

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाची चर्चा पोहचली दिल्लीत

 फ्लायओव्हर नाही तरीही टोलवसुली

यावेळी राज ठाकरे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. या टोलमध्ये पेडर रोडच्या फ्लायओव्हरचा समावेश आहे. जो अजूनपर्यंत झालेला नाही. पण त्यासाठी टोलची वसुली केली जाते. टोल का लागू केला जात आहे? रोडटॅक्सचे पैसे कुठे जातात? हे सगळे टोल म्हैसकर यांच्याकडेच कसे आहेत? असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारले.

 लोकांची टोल भरण्याची मानसिकता

राज ठाकरे यांनी यावेळी टोल भरणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवरही टीका केली. लोकांना नक्की काय हवे हेच कळत नाही. खोटी आश्वासने देऊनही लोक त्याच पक्षांना मते देतात. आपण फसवले जातोय, याची जाणीव लोकांना होते की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केलाय.

या सर्व पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. त्यांच्याशी चर्चा करणार. त्यानंतर काय करायचे याचा निर्णय घेणार, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता टोलनाके आणि टोलदरवाढीवरून मनसे आक्रमक झाली असून हा मुद्दा तडीस लावणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी