29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमुंबईअटकेची भीती असलेल्या सचिन वाझे यांची 'हे जग सोडण्याची' भाषा

अटकेची भीती असलेल्या सचिन वाझे यांची ‘हे जग सोडण्याची’ भाषा

धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ

टीम लय भारी

मुंबई : अटकेची भीती असलेले मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये ‘हे जग सोडण्याची’ही भाषा केली आहे. त्यात त्यांनी सहका-यांना दोष देत असल्याचे म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीस दलात सेवेत असलेले सचिन वाझे हे ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्यानंतर एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनतर वाझेंची नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे.

या प्रकरणात एटीएसने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर वाझे यांच्या भोवती फास आवळण्यात आला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने १२ मार्चला वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्जावर 19 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझे यांना एटीएसकडून संशयित म्हणून अटक होण्याची शक्यता आहे.

अटकेची भीती असलेल्या सचिन वाझे यांची 'हे जग सोडण्याची' भाषा

दरम्यान सचिन वाझे यांनी स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवलेल्या स्टेटसने शनिवारी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये सहका-यांवर आरोप केले आहेत. या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिका-यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र आता माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवले आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे दिसत असल्याचे नमूद करत ठाणे न्यायालयाने वाझे यांना अंतरिम संरक्षण नाकारले. मनसुख हिरन यांच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असे दिसते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. अतिरिक्त सरकारी वकील विवेक कडू यांनी सचिन वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टात आक्षेप नोंदवला व एटीएसकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. त्याआधारावर कोर्टाने वाझे यांना अंतरिम संरक्षण नाकारले व वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मार्च रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही वाझे यांना लक्ष्य केले आहे. मनसुख मृत्यू प्रकरणात एटीएस तर स्फोटकं प्रकरणात एनआयए तपास करत असून दोन्ही यंत्रणांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला वाझे यांना सामोरे जावे लागणार आहे. एनआयएने आजच वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाकडून अंतरिम संरक्षण नाकारण्यात आल्यानंतर तपास यंत्रणा वाझे यांच्याबाबत पुढे कोणती पावले टाकतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी