27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeमुंबईWave of Corona : जानेवारीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्य!

Wave of Corona : जानेवारीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्य!

टीम लय भारी : अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

मुंबई : वैद्यक तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्यात खरी कसोटी आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) आली तर ती कशी थोपयावची याची तयारी नागरिकांनी खरे तर नियमांचे पालन करून करावयास हवी.

कोरोना आता संपला, लस पण आली मग काय बिनधास्त फिरा आता काही काळजी नाही या बेफिकिरी मधून चौखूर उधळलेली जनता. ना तोंडावर मास्क की सोशल डिस्टन्सचे पालन. सर्वत्र आता दिसणारे हे दृश्य. पण हीच मानसिकता आणि अतिआत्मविश्वास उलटण्याची दाट चिन्हे येत्या काही दिवसात दिसण्याची भीती वैद्यक तज्ञाकडून व्यक्त होत आहे.

देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध राज्यात त्याचे बरे वाईट परिणाम दिसू लागले. नवी दिल्लीत दुसरी आणि तिसरी लाट आली. तर गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आदी राज्यात दुसरी लाट हळूहळू सुरू झाली. महाराष्ट्रचा विचार केला तर सध्या पहिली लाट ओसरण्याच्या अथवा संपण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरी लाट ही साधारण जानेवारीच्या मध्यास येऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात जवळपास सर्व मुक्त झाल्याने व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण ते करताना नियमांची सरळसरळ पायमल्ली सुरू आहे. आता लस आली आहे मग काळजी नाही ही वृत्ती खूप धोकादायक आहे. कारण जी लस उपलब्ध होणार आहे ती किती प्रभावी आहे आणि ती किती काळ मानवी शरीरात काम करेल याची कोणाला खात्री नाही. मुळात लस आणि औषध यातील फरक अजून जनतेला समजला नाही, असे वैद्यक तज्ञांनी सांगितले.

लस ही त्या विषाणूला अटकाव करण्यासाठी शरीरात काम करते. पण तिचा प्रभाव किती काळ राहील याबाबत लस निर्माते ठामपणे सांगू शकत नाहीत. विविध पातळ्यांवर कसोटीस पात्र ठरून मग ही लस तयार होते.

हा विषाणू त्याचे मूलभूत अंतर्गत बदल करतो ज्याला जेनेटिक चेंजेस म्हटले जाते. त्यामुळे त्याची लक्षणे ही नेहमी बदलत असतात. सध्या जी लस विविध कंपन्या तयार करत आहे त्यामध्ये संशोधन करताना विषाणूच्या कोणत्या लक्षणावर अभ्यास केला आहे हे पाहणे महत्वाचे ठरते. रशियाने स्फुटनिक नावाची लस घाईघाईने बाजारात आणली पण ती तेवढी प्रभावी नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.

भारतात सुद्धा स्वदेशी बनावटीच्या कोवाक्सिन, तसेच सिरमची लस आदी चार विविध कंपन्यांनी आपली लस प्रमाण बद्ध करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. काही लस या दुस-या आणि तिस-या टप्प्याच्या चाचणीत आहेत. आणि या लसीचा प्रभाव हा कधी 67 तर कधी 90 टक्के एवढाच जाणवतो. लसीला मान्यता देणा-या आरोग्य विभागाने या सर्व कंपन्यांना आपले चाचणी अहवाल आणि त्याची अंमलबजावणी सादर करण्यास सांगितले आहे. हा सर्व खेळ पाहता मार्चपर्यन्त कोणतीही लस येऊ शकत नाही, असे अनेक डॉक्टरनी बोलताना स्पष्ट केले आहे.

आता उद्याच लस सर्वांना मिळणार असे चित्र तयार करून विविध वृत्तवाहिन्या या लस कार्यक्रम राबविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षण केंद्राचे चित्रीकरण करून दाखवत आहेत. हे सर्व धोकादायक आहे. कारण हो मोहीम राबविण्यासाठी आधी तीन ते चार महिने तयारी करावी लागते, प्रशिक्षण द्यावे लागते. पण या वृत्तवाहिन्या याचे भान न ठेवता अतिउत्साहात चुकीचे दाखवत असल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या सर्व काही सुरू असताना आणि चाचण्या कमी झाल्याने रुग्ण वाढ घटली असल्याचे चित्र दिसत असताना हळूहळू अनेक नवीन रुग्ण पुन्हा दिसत आहेत. रंगभूमीवर आठ महिन्यांनी पहिल्या वेळी प्रयोग करणारे अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोना झाल्याने पुढील सर्व नाट्य प्रयोग रद्द करण्याची वेळ आली आहे. तसेच अन्य विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर कोरोना बाधित होत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी