28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईभूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री...

भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री क्रमांक

एकत्रित ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाड्या आहेत. पर्यायाने ठाणे आणि मीरा- भाईंदर महापालिकेच्या ताब्यातील 1,387 हेक्टर जमीन वन कायद्यातील कलम 4 अंतर्गत राखीव वन म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. असे असताना या जिल्ह्यात गेल्या 25 वर्षात चक्रवाढ व्याजासारखे शहरीकरण झाले आहे. एकीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आदी परिसरातील कांदळवनाची लूट रेती माफियांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यासमोर चालवली आहे.

दुसरीकडे शहरीकरणात खाड्या बुजवून आधी चाळी आणि नंतर बेकायदा इमारती बांधण्यात येत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन लुटल्यावर आता जिल्हा प्रशासनाला जाग आली जाग असून कांदळवनाचे प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारीसाठी आता टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.

वन विभागाने 12 जानेवारी 2021 मध्ये एक अधिसूचना काढून राज्यातील 1,575 हेक्टर कांदळवनाची जमीन राखीव वनक्षेत्रे म्हणून घोषित केली आहे. शिवाय ठाणे आणि मीरा- भाईंदर महापालिकेच्या ताब्यातील 1,387 हेक्टर जमीन वन कायद्यातील कलम 4 अंतर्गत राखीव वन म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. यातील मुंबईतील 253 हेक्टर कांदळवन क्षेत्राच्या संरक्षण करण्यास हातभार लागला आहे. या अनुषंगाने कांदळवनाचे प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी 1800-22-0002 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. तसेच कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तसेच कांदळवनाच्या ऱ्हासाबाबत जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1800-22-0002 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारी असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात कांदळवनांची झाडे तोडली जात असतील, त्या ठिकाणी भराव केला जात असेल, कांदळवन रोपांची कत्तल केली जात असेल, पाणथळ जागांवर भराव ला जात असेल तसेच संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

कांदळवनाचा परिसंस्थेसाठी मोलाचा हातभार
निसर्गाच्या परिसंस्थेत कांदळवन महत्वाचा वाटा उचलते. कांदळवनामुळे जमिनीची धूप थांबते, पर्यायाने पुराचा धोका नसतो. कांदळवनाच्या मुळाशी मासे अंडी घालतात, शिवाय खेकड्या सारखे कवचधारी यांचा अधिवास याच परिसरात असतो. त्यामुळे रोहित( flemingo), बगळे सारखे पक्षी कांदळवन परिसरात अन्नाच्या शोधत फिरत असतात आणि त्यांना ते अन्न मिळतेही. भारतात कांदळवनाच्या 18 प्रजाती आढळून येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी