30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeराजकीयअजित पवारांमुळे होरपळलेल्या भाजपची ज्योतिरादित्य शिंदेंबाबत सावध पाऊले

अजित पवारांमुळे होरपळलेल्या भाजपची ज्योतिरादित्य शिंदेंबाबत सावध पाऊले

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चार महिन्यांपूर्वी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या नितींचा अवलंब केला होता. अजित पवार यांना सोबत घेऊन औट घटकेचे सरकार स्थापन केले होते. भाजपची त्यावेळी देशभरात चांगलीच नाचक्की झाली होती. अशी नाचक्की मध्य प्रदेशमध्ये होऊ नये म्हणून भाजप अतिशय सावध पावले टाकत आहे. किंबहूना जनभावना सुद्धा काँग्रेसच्या विरोधात राहिल याचीही काळजी भाजपने घेतलेली दिसत आहे.

चार महिन्यांपूर्वी भाजपने अजित पवारांना आपल्या गोटात खेचले होते. कुणालाही थांगपत्ता लागू न देता पहाटे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी गटनेता म्हणून अजित पवारांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. या पत्राचा गैरवापर करून अजित पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. भाजपनेही राज्यपालपदाचा आपल्याला हवा तसा वापर केला होता. भाजपने राष्ट्रवादीचे पाच आमदार नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये लपवून ठेवले होते. शरद पवारांच्या खेळीने हे पाच आमदार व अजित पवारांच्या गटातील अन्य सगळ्याच आमदारांना महाविकास आघाडीकडे परत आणले होते. भारतीय राज्य घटनेची यथेच्छ पायमल्ली करणारा हा अनैतिक प्रकार जनतेला, प्रसारमाध्यमांना व कायदेशीर तज्ज्ञांनाही पटलेला नव्हता. त्यामुळे देशभरातून त्यावेळी भाजपवर सडकून टीका झाली होती. आता मध्य प्रदेशमध्ये मात्र असा प्रकार होणार नाही याची पुरेपर काळजी भाजपने घेतली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रेसकडून मोठा अन्याय झाला आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. त्यांना पक्षातही कोणतीच जबाबदारी नाही. त्यांचा लोकसभेत काँग्रेसनेच पराभव केला. त्यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली जात नाही. तरूणांना काँग्रेस डावलत आहे, अशा प्रकारचे चित्र तयार करून ज्योतिरादित्य शिंदे यांच्याविषयी देशभरात सहानुभूतीची लाट तयार करण्यात आली आहे. अजित पवारांच्या वेळी जनता भाजपवर टीका करीत होती. परंतु शिंदे यांच्या बाबतीत जनता काँग्रेसवर टीका करीत आहे. जनतेची पहिली सहानुभूती मिळविण्यात शिंदे व भाजप यशस्वी झाले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा सुद्धा देऊन टाकला. त्यानंतर शिंदे समर्थकांच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनीही राजीनामे दिले. त्यामुळे मध्य प्रदेशमधील सध्याच्या सत्ता संघर्षात शिंदे केंद्रीभूत राहतील याची काळजी भाजपने घेतली आहे. शिंदे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यामुळे 20 आमदारांना सोबत घेऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत, असे पद्धतशीर चित्र जनमाणसांमध्ये पोचविण्यात भाजप यशस्वी झाले आहे.

अजित पवारांच्या बाबतीत नेमका उलटा प्रकार झाला होता. अजितदादांनी राष्ट्रवादीच्या वतीने भाजपला पाठींबा दिला होता. त्यासाठी पत्राचा गैरवापर केला होता. अजितदादांनी दावा केलेला एकही आमदार त्यांच्यासोबत नंतर नव्हता. अजितदादांच्या बंडाला शरद पवारांचाही पाठिंबा नव्हता. किंबहूना अजितदादांचे बंड मोडून काढण्यासाठी शरद पवारांनी त्यावेळी कंबर कसली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे डावपेच त्यांच्यावरच उलटले होते. मध्य प्रदेशमध्ये मात्र आपले डावपेच फसणार नाहीत, शिवाय जनतेची भावनाही काँग्रेसच्या विरोधात जाईल याची काळजी भाजपने घेतली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर येईल असे सध्या तरी दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर, नरेंद्र मोदींची घेतली भेट

शरद पवारांनी उघड केले, अजित पवारांचे भाजपसोबत जाण्याचे कारण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी