30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeराजकीयPolitics : देवेगौडा वयाच्या ८७ व्या वर्षी करणार ‘कमबॅक’!

Politics : देवेगौडा वयाच्या ८७ व्या वर्षी करणार ‘कमबॅक’!

टीम लय भारी

बंगळुरू (वृत्तसंस्था) : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा कर्नाटकातून राज्यसभेची निवडणूक (Politics) लढणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वतीने हा निर्णय आपण जाहीर करत असल्याचं देवेगौडा यांचे चिरंजीव एच.डी. कुमारस्वामी यांनी जाहीर केले.

काँग्रेसने राज्यसभेसाठी देवेगौडा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षातील आमदार, सोनिया गांधी आणि इतर नेत्यांच्या विनंतीला मान देऊन एचडी देवेगौडा निवडणूक लढण्यासाठी तयार झाले आहेत. मंगळवारी देवेगौडा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. सर्वांच्या विनंतीला मान दिल्याबद्दल देवेगौडा यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली.

देवेगौडा यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेला मतदारसंघ नातू प्रज्वल रेवन्नासाठी सोडला होता. पण ते ज्या मतदारसंघातून निवडणूक लढले, तिथे भाजप उमेदवाराने त्यांचा पराभव केला. पण त्यांचा नातवाचा विजय झाला होता. देवेगौडा आता १९९६ नंतर पहिल्यांदाच राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत जाणार आहेत. यापूर्वी ते पंतप्रधान असताना राज्यसभेत होते. उद्योगपती विजय मल्ल्या, बी.एम. फारूक यांसारख्या उद्योगपतींना राज्यसभेत पाठवणा-या जेडीएसने यावेळी देवेगौडांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, ८७ वर्षीय वडिलांना राज्यसभेवर जाण्यासाठी तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती, असंही कुमारस्वामी म्हणाले. लोकांमुळेच ते पंतप्रधान झाले, जिंकले आणि विरोधकांचा पराभवही केला. लोकांमुळेच त्यांनी अनेक मोठी पदे भूषवली, अशी प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली. कर्नाटकातील राज्यसभेच्या जागांसाठी १९ जूनला मतदान होणार आहे.

भाजपने दोन उमेदवार दिले असून तिस-या उमेदवाराचीही चर्चा आहे. काँग्रेसकडे ६८ आमदारांची मते असून एका जागेसाठी ही मते पुरेशी आहेत. काँग्रेसने वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना उमेदवारी दिली आहे. खर्गे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ते आता पहिल्यांदाच राज्यसभेत जाणार आहेत. काँग्रेसकडे काही मते शिल्लक राहणार असल्याने जेडीएसला मदत केली जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी