35 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरराजकीयगिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच

गिरीश महाजनांच्या फोननंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी गावात पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी एक मोठी घटना घडली. जरांगे-पाटील यांनी धीराने घ्यावे, अशी विनंती करणारा फोन त्यांना आला. पण जरांगे-पाटील काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच कोंडीत पकडले. बराचवेळ त्यांच्यात संभाषण सुरू होता. जरांगे-पाटील यांना पटवण्याचे सर्व प्रयत्न संपल्यावर शेवटी जरांगेच म्हणाले धन्यवाद आणि फोन बंद झाला. तो फोन होता भाजपचे संकटमोचन अशी प्रतिमा असलेले आणि सध्या मंत्री असलेले गिरीश महाजन यांचा.

मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. पण १ सप्टेंबर रोजी पोलिसांंनी उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला आणि अंतरवाली सराटी गाव संपूर्ण भारताला ठावूक झाले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळले. जरांगे-पाटील उपोषणावर ठाम राहिले. अखेर १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सरकारने मागितलेल्या एक महिन्याच्या मुदतीत आणखी दहा दिवस दिले. त्यानंतर कसूभरही मागे हटणार नाही, हेही स्पष्ट केले. या ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात सरकारने मुदतवाढ मागितली आणि जरांगे-पाटील आक्रमक झाले. त्यांना जाहीर केल्याप्रमाणे आजपासून (२५ ऑक्टोबर) अंतरवाली सराटी गावात पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता.

सरकारने मराठा आरक्षणाबाबत ४० दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. अजूनही सरकार यावर पाऊल उचलत नाही. म्हणून जरांगे-पाटील उपोषणासाठी पुन्हा एकदा तयार झाले आहेत. यादरम्यान भाजपचे नेते गिरीष महाजनांनी जरांगेंना फोन करत, आपण उपोषण मागे घ्या, अशी साद घातली. मात्र जरांगेंनी उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. आपण दोन दिवसात गुन्हा मागे घेणार होता. ते अजून मागे घेतले नाहीत. तुम्ही आरक्षण देणार काय देणार? असा प्रतिसवाल जरांगेंनी केला होता.

हे ही वाचा

जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण, अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

50 खोक्यांचे आरोप करणाऱ्यांनीच 50 कोटींची मागणी केली; मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट

सुषमा अंधारेंचा रोष कुणावर? म्हणाल्या धमकी द्यायचे काम नाही

मनोज जरांगे-पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद 

गिरीश महाजन – आमचं काम सुरू आहे. आम्ही काम करणारच आहोत. आरक्षण देणारच आहोत. मागच्यावेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. चांगला मार्ग मिळत असेल तर वेळही दिला पाहीजे.

जरांगे-पाटील – तुम्ही एक महिना मागितला, आम्ही ४० दिवस दिले. अजून किती वेळ देऊ?

गिरीश महाजन – शिंदे समिती काम करत आहे. यावर मार्ग निघेल.

जरांगे-पाटील – ते वर्षानुवर्षे काम करतील. आम्ही काय फाश्या घ्याव्यात का? गुन्हे मागे घ्या म्हटलं तर मागे घेत नाहीत. आरक्षण काय देणार?

गिरीश महाजन – ते काम लगेच होईल. आपल्या हातचं काम आहे. आंदोलकांना पोलीस ठाण्यात, कोर्टात बोलावले नाही.

जरांगे-पाटील – २ दिवसांत गुन्हे मागे घेतो म्हणून सांगितले होते.

गिरीश महाजन – २ दिवसांत गुन्हे मागे घेता येत नाही. काही तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्या लागतात.

जरांगे-पाटील – आमच्यावर डाव ठेवला आहे

गिरीश महाजन – नाही तसं नाही, सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

जरांगे-पाटील – १६ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने साधी सहानुभूती दाखवली नाही. ४० दिवसांत सरकारनं काय केलं? २ दिवसांत गुन्हे मागे घेतो सांगितलं ते अजून केलेलं नाही. म्हणजे आम्ही आंदोलन केलं की गुन्हे बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे.

गिरीश महाजन – तसं नाही, हे सर्व लवकर केले जाईल.

जरांगे-पाटील आणि महाजन यांच्यात बराच वेळ संभाषण सुरू होते. महाजनांनी त्यांचे संवाद कौशल्य पणाला लावले होते. तरीही जरांगे-पाटील त्यांना बधत नव्हते. अखेर सरकारचा मान राखतो, मुख्यमंत्र्यांचा मान राखतो पण उपोषण सुरूच राहणार, असे सांगत जरांगेंनी महाजनांना धन्यवाद म्हटले आणि संभाषणाला पूर्णविराम मिळाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी