स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा फोटो छापल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याचा स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सदस्यांनीही निषेध केला असून त्याचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेवर गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल आहे. नवीन संचालक मंडळ आल्यापासून बँकेच्या कामकाजाबाबत वारंवार अनेक तक्रारी येत आहेत. आता तर थेट नथुराम गोडसेचा फोटो छापून सदावर्ते यांनी महात्मा गांधीजींचा अपमान केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. कहर म्हणजे गांधीजींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहेत. त्यामुळे काँग्रेस जास्तच आक्रमक झाला आहे.
काल (२८ सप्टेंबर) यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा झाली. गोडसेचा फोटो अहवालावर छापल्याने यावेळी मोठा राडा झाला. यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी गोडसेचा फोटो बैठकीत वापरला होता.
गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी.
राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे.
सदावर्ते सारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे तरी त्याच्यावर कारवाई का होत… pic.twitter.com/dgmwWSpMJJ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2023
गुणरत्न सदावर्ते कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतात. आता तर त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे याचा फोटो छापला आहे. त्यामुळे त्यांना लगेच अटक करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गोडसेचा फोटो छापून त्याचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोपचे काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी केला आहे.
गांधींचींचे विचार आता शिल्लक राहिलेले नाही, एवढेच बोलून गुणरत्न सदावर्ते थांबले नाहीत तर त्यांनी नथुराम गोडसेचे गुणगान गायला कमी केलेले नाही. नथुराम गोडसे अखंड भारताचा पुरस्कर्ता होते, अशी भलावणही सदावर्ते यांनी केली. त्यामुळे याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. भाजपचे सरकार आले की, नथुरामाच्या औलादी डोके वर काढतात, असा आरोप करत राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला आहे.
आता या प्रकरणी सहकार आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर गोडसेचा फोटो छापल्यामुळे एसटीचे कर्मचारीदेखील संतप्त झाले आहेत. या सभेत गुणरत्न सदावर्ते यांनी मनमानी कारभार केल्याचाही आरोप संदीप शिंदे यांनी केला आहे.
हे ही वाचा
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !
मंत्रालयातील प्रवेशाचा नियम, कुणाचा ‘वरचा मजला’ रिकामा? नोकरशाहीवर टीकेचा आसूड
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !
दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानेच भारताची जगात ओळख आहे. गांधीजींच्याच नेतृत्वाखाली भारताने इंग्रजांना देश सोडायला लावले. अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हेच काही लोकांना आणि संघटनांच्या पचनी पडत नाही. महात्मा गांधीजींचा अपमान भारतीय जनता पक्ष, त्यांच्या सहकारी संस्था आणि त्यांच्याशी संलग्न व्यक्ती सातत्याने करत आहेत. अशा प्रवृत्तींना धडा शिकवणे गरजेचे आहे. सरकार याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करेल, अशी अपेक्षा अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.