28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयमराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे असे का म्हणाले...

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे असे का म्हणाले…

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालनासह राज्यातील मराठा आंदोलक, समाज आक्रमक झाले असताना जालनामध्ये जखमी आंदोलकांना भेटायला गेलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वक्तव्य मराठा आंदोलन चिघळले असताना का केले, याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही राज्यभर उमटत आहेत. आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाही. राज ठाकरे हे सोमवारी जालना दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर अनेकांचे लक्ष आहे.

राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला. त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते म्हणाले.

त्यानंतर राज ठाकरे हेही घटना घडली त्या ठिकाणी गेले आणि उपस्थित मंडळींना संबोधित करताना त्यांनी,’ राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना मी सांगितले होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयात हा तिढा आहे. सगळेच राजकारणी मराठा आरक्षणावरून मराठ्यांना फसवत आहे. पूर्वी विरोधात असलेल्या मंडळींनी अनेक आश्वासन दिली. सत्तेत आल्यावर त्यांनी आंदोलनकर्त्यांना तुडवले. आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करणारे पोलिस दोषी नाहीत, त्यांना आदेश देणारे दोषी आहेत ‘ असे म्हणून राज ठाकरे यांनी सत्ताधारी मंडळींवर निशाणा साधला. शुक्रवारी मराठा आंदोलकर्त्यावर लाठीचार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली होती.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी