30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईशिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, पण आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही :...

शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, पण आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही : सुधीर मुनगंटीवार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने एक शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल. नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात येऊ इच्छित नाहीत. त्यामुळे गडकरी मुख्यमंत्री होणार नाहीत, असे मत भाजपचे नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. राज्यात महायुतीचेच सरकार येईल. शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही आज राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती व घटनात्मक तरतुदी यांबाबत राज्यपालांशी भेटून आम्ही चर्चा करणार आहोत. स्थिर सरकार देण्याबाबत राज्य घटनेमध्ये काय तरतुदी आहेत. त्या दृष्टीने आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. सत्ता स्थापनेचा दावा मात्र आज केला जाणार नसल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

लाखो लोकांच्या साक्षीने भाजप व शिवसेनेने एकत्र भूमिका मांडलेली आहे. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना बडे भाई म्हणतात, तर उद्धव हे देवेंद्र फडणवीस यांचे बडे भाई आहेत. भाजप – शिवसेनेमध्ये एखादी समस्या उपस्थित झाली तरी ती एकमताने सोडविली जाते. यापूर्वी सुद्धा असे अनेकदा पेच निर्माण झाले होते. पण भाजप व शिवसेनेने एकत्र बसून सोडविले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल, असे बोलले जात आहे. पण हे दोन्ही पक्ष असा निर्णय घेणार नाहीत. काँग्रेसला भीती आहे. शिवसेनेला आता पाठींबा दिला, तर आयुष्यभर बाहेर बसू असे काँग्रेसला वाटते. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्यामुळे तो शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने जाहीररित्या विरोधात बसण्याचीच भूमिका घेतलेली आहे. जनतेचा कौल भाजप व शिवसेनेला मिळालेला आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेची युती झाली पाहीजे. आम्ही सध्या याच एकमेव पर्यायावर चर्चा करीत आहोत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘राष्ट्रवादीचे फुटणारे आधीच फुटले, आता कुणी फुटणार नाही’

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेचा विरोध नाही : संजय राऊत

सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील दुपारी राज्यपालांना भेटणार, सत्ता स्थापनेच्या हालचाली

शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची सुधीर मुनगंटीवार गोड बातमी देतील : संजय राऊत

भाजपकडून आमदारांना फोडले जात असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. शिवसेनेच्या आमदारांना कोणी फोडतही नाही, आणि तो फुटतही नाही. शिवसेना आणि भाजपचे आमदार अनेक वर्षे विऱोधी पक्षात राहिले आहेत. तरीही ते फुटलेले नाहीत. लाखो लोकांची मते घेऊन निवडून आलेल्या आमदारांना कोणी फोडण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित हस्तक्षेपाविषयी ते म्हणाले की, संघ राजकारणात सक्रीय सहभाग घेत नाही. संघ देश हिताच्या प्रश्नात लक्ष घालतो. मंत्री, मुख्यमंत्री कोण असावा यात संघ कधीही लक्ष देत नाही. देशहिताच्या प्रश्नात त्यांना भाजपएवढाच काँग्रेस पक्षही महत्वाचा वाटतो. संघाबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी