25 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीयबारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?

बारामतीमधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा खरी ठरली तर नणंद विरुद्ध भावजय अशी ही राजकीय लढाई असेल. बारामती हा पवार घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. विधानसभा आणि लोकसभेत बारामतीमधून पवार घराण्यातील उमेदवार विजयी होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे आता सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होते आहे.

या चर्चेचे सुप्रिया सुळे यांनीदेखील स्वागत केले आहे. ‘ही लोकशाही जगली पाहिजे. टिकली पाहिजे’, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. बारामती हा खऱ्या अर्थाने पवारांचा मतदारसंघ. म्हणजे विधानसभा असो की लोकसभा विजयी उमेदवार पवारच असतो. आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर 2009 पासून सलग तीनवेळा सुप्रिया सुळे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. या अगोदर पाचवेळा शरद पवार बारामतीमधून खासदार म्हणून संसदेत गेलेत. तर 1991 मध्ये अजित पवारांनीदेखील याच बारामती मतदारसंघातून थेट संसदेत पाऊल ठेवले होते.

असा या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपचे अनेक प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. गेल्यावेळी राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी भाजपकडून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या अगोदर 2014 मध्ये महादेव जानकर यांनीही बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांनाच पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा या अभेद्य बारामतीमधून आता सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे.

आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री शिंदेंचा युरोप दौरा लांबणीवर?

धनंजय मुंडेंच्या जनता दरबारला तुडुंब गर्दी !

अण्णा द्रमुकने सोडली भाजपची साथ, एनडीएमधूनही बाहेर

लोकसभेचा विचार केल्यास बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. बारामतीचे आमदार अजित पवार आहेत. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे आहेत. दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल हे भाजपचे आहेत. तसेच खडकवासल्यातही भाजपचे भीमराव तापकिरे आमदार आहेत. पुरंदर आणि भोर हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. पुरंदरमध्ये चंदुकाका जगताप आणि भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहे. म्हणजेच सहापैकी चार आमदार सुप्रिया सुळेंच्या विरोधातील आहेत, हे स्पष्ट आहे. त्यातच सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी मिळाली तर येणारी लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी अतिशय खडतर असेल, यात शंका नाही. त्यामुळे नणंद विरुद्ध भावजय असा सामना झाल्यास, त्याची देशात चर्चा होईल, एवढे नक्की.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी