29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपवारसाहेबांनी पंकजा मुंडेंना मदतीची भूमिका घेतली होती, पण भाजपने त्यांना डावलले :...

पवारसाहेबांनी पंकजा मुंडेंना मदतीची भूमिका घेतली होती, पण भाजपने त्यांना डावलले : सुप्रिया सुळे

पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये सध्या कोंडी केल्याची कार्यकर्त्यांची भावना अधिक तीव्र झाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 19 कोटींच्या मालमत्तेवर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने टाच आणली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स (ट्विटर)वर प्रतिक्रीया देत भाजपच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे यांना मिळणारी वागणूक असल्याचे म्हटले आहे.

सन 2014 नंतर भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वारंवार होत असते. पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये परळी विधानसभा मतदार संघातून आमदारकीला पराभव झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप अद्याप यशस्वी झाली नाही. नुकतीच पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ति परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज झाल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तूळात रंगल्या, या नाराजीमुळे पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाईचा बडगा उचलल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. केंद्राकडून त्यांना मदत व्हावी अशी मागणी केली जात होती. पक्षांतर करुन भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांच्या कारखान्यांना मदत झाली. मात्र पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मात्र डावलण्यात आल्याची चर्चा होत आहे. पंकजा मुंडे यांच्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल एक्स (ट्विटर)वर प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या. जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही.

नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी