29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराष्ट्रीयअण्णा द्रमुकने सोडली भाजपची साथ, एनडीएमधूनही बाहेर

अण्णा द्रमुकने सोडली भाजपची साथ, एनडीएमधूनही बाहेर

भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत मोठा धक्का बसला आहे. सत्तेसाठी ज्या अण्णा द्रमुक पक्षाशी भाजपने मैत्री केली त्या अण्णा द्रमुक पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय काल घेतला. विशेष म्हणजे अण्णा द्रमुक पक्षाच्या या निर्णयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा जल्लोष केला.

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागाम (अण्णा द्रमुक) या पक्षाने भाजपसोबत बांधलेल्या गाठी काल उसवल्या. आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:ची आघाडी उभी करण्याचा निर्णय जाहीर केला. यावरून कपिल सिब्बल यांनी भाजपची तुलना तंबूत शिरलेल्या उंटाशी केली आहे.

अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली. यात भाजपशी मैत्री तोडून एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपासून अण्णा द्रमुक आणि भाजपचे नेते यांच्यात पटत नव्हते. भाजपचे नेते के. अण्णामलाई वारंवार अण्णा द्रमुक पक्षावर टीका करून नेत्यांची बदनामी करत असल्याचा आरोप अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी या बैठकीत केला.

विशेष म्हणजे भाजपविरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची 18 जुलैला बंगळुरूमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जुलैला दिल्लीत भाजपप्रणीत एनडीएची बैठक झाली. या बैठकीला 38 पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपने केला होता. या बैठकीला अण्णा द्रमुक पक्षाचे महासचिव ई.के. पलानीस्वामी उपस्थित राहिले होते.

भाजपमुळे अल्पसंख्यांकांची मते गमावल्याची भावना अण्णा द्रमुकच्या नेत्यांमध्ये आहे. त्यातच भाजपचे नेते के. अण्णामलाई वारंवार अण्णा द्रमुकच्या नेत्यांची बदनामी करतात, असा आरोप होता. त्यामुळे भाजपविरोधात अण्णा द्रमुकमध्ये कटुता निर्माण झाली होती. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रमुकचा भाजपला विरोध आहेच शिवाय विरोधी पक्ष अण्णा द्रमुकनेही भाजपशी नातं तोडल्यामुळे तमिळनाडूमध्ये आता भाजपला मित्र उरलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी