29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईदोन्ही काँग्रेसवर विसंबून राहिलेल्या शिवसेनेची अवस्था ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’

दोन्ही काँग्रेसवर विसंबून राहिलेल्या शिवसेनेची अवस्था ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला चांगलेच गॅसवर ठेवले आहे. मुख्यमंत्रीपदाचे लाल गाजर दाखवून काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला भाजपसोबत काडीमोड घेण्यास भाग पाडले. पण आता सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून कमालीची दिरंगाई होत आहे. त्यामुळे शिवसेनेची अवस्था ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’ लागल्यासारखी झाली आहे.

अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद व सत्तेत समसमान वाटा या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत पंगा घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यावेळी शिवसेनेला प्रोत्साहन देणारी विधाने केली. शिवसेनेने भाजपची साथ सोडली तर आम्ही पाठिंबा देऊ, शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, अशी विधाने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळी केली होती.

परंतु शिवसेनेने भाजपसोबत पुरता काडीमोड घेतला. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या. तिन्ही पक्षांची सत्ता स्थापन होईल, अशी विधानेही या बैठकानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. परंतु शरद पवार यांच्या ताज्या विधानाने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्ता स्थापनेबाबत भाजप – शिवसेनेला विचारा, असे विधान शरद पवार यांनी केले. काल सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही राज्यातील सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांवर दोन्ही काँग्रेसनी पाणी फेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत की काय, असे आता बोलले जाऊ लागले आहे.

शिवसेनेने भाजपसोबतचे परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेनेसमोर कोणताही पर्याय राहिलेला नाही. मात्र दोन्ही काँग्रेसनी सत्ता स्थापन करण्यास चालढकल चालविली आहे. सत्तेत अधिकचा वाटा मिळावा म्हणून शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी दोन्ही काँग्रेस चालढकल करीत असावेत असा एक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर कौतुक केले. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला गोंजारून आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सहकार्य करणार नाही किंवा भाजपला सहकार्य करू शकते असेही तर्कट आता मांडले जात आहे.

राज्यात भाजपचीच सत्ता येणार, अशी ठोस विधाने भाजपकडून केली जात आहेत. भाजपचे नेते शिवसेनेवर तोफा डागत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत नाहीत. यावरून भाजप व राष्ट्रवादी एकत्र डाव खेळत तर नाहीत ना अशीही शंका राजकीय वर्तुळात बोलली जाऊ लागली आहे.

हे सगळे घडत असताना शिवसेनेची अवस्था फारच बिकट झाली आहे. सत्ता स्थापन करण्याची संधी तर दिसत आहे, परंतु दोन्ही काँग्रेसच्या वेळकाढूपणामुळे काहीच करता येत नाही. शरद पवार कधीही कोणतीही खेळी खेळू शकतात. ही खेळी शिवसेनेला अडचणीत आणणारी तर नसेल ना अशीही भीती सेनेच्या गोटातून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

सरकार स्थापनेबद्दल भाजप – शिवसेनेला विचारा : शरद पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी