30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’

‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण देशातील जनतेला हे मान्य नाही. हिंदू समाजातील लोक सुद्धा हिंदू राष्ट्र तयार करण्यास तयार नाहीत. त्यांना धर्मनिरपेक्ष देश हवा आहे. धर्मावर आधारित स्थापन झालेल्या पाकिस्तान, बांगलादेशचा सत्यानाश झाल्याचे लोकांना माहित आहे. तशी अवस्था भारताची होऊ नये म्हणून लोकांना हिंदू राष्ट्र होऊ द्यायचे नाही, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर केला आहे.

सुधारित नागरिक कायद्याविरोधात जलील यांच्या पुढाकाराने औरंगाबाद येथे आज दुपारी २ वाजता आंदोलन आयोजित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जलील यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे विधेयक मंजूर करताना लोकसभेत मी उपस्थित होतो. लोकांना सुरूवातीला समजले नाही की, या कायद्यात नक्की काय आहे. आम्ही तर या विधेयकाला सुरूवातीपासून विरोध करीत आहोत. आमचे नेते ओवेसी यांनी या विधेयकाची प्रत लोकसभेत फाडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. या देशात नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच सगळे कळते. बाकी सगळेजण बावळट आहेत.

-इम्तियाज जलील, खासदार

जलील पुढे म्हणाले की, या कायद्याच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे. आंदोलाच्या माध्यमातून लोकांनी भाजपला योग्य तो संदेश दिला आहे. भाजप सरकार देशाला कमजोर करीत आहे. पण देशाला असे कमजोर होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत हिंदू – मुस्लीम व सगळ्या जाती – धर्मातील लोक एकत्र आले आहेत. देशभरातील मोर्चांमध्ये सगळेजण एकत्र येत आहेत. आम्ही आयोजित केलेला मोर्चा सुद्धा कोणत्या एका पक्षाचा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे सगळेजण या मोर्चात येतील. महिला, मुले, वृद्ध, सगळे जाती धर्माचे लोक येणार आहेत. हा शांततापूर्ण मोर्चा असणार आहे. हा मोर्चा दोन वाजता निघेल. पोलिसांना आम्ही आश्वासन दिले आहे की, हा मोर्चा शांततेत असेल. यावेळी आम्ही विभागीय आयुक्तांनाही निवेदन देणार आहोत.

या आंदोलनात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. आम्ही तीन दिवसांपासून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. तरूणांचे गट तयार केले आहेत. काहीजण दारू पिऊन हुल्लडबाजी करू शकतात. त्यामुळे आम्ही स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. कोणतीही हुल्लडबाजी, कायदाबाह्य कृत्य होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. चांगल्या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

अभिनेत्री स्वरा भास्करचा भाजपवर नाव न घेता घणाघात, महंमद अली जीनांची दिली उपमा

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी