28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईशरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

टीम लय भारी

मुंबई : नेता जेवढा मातब्बर तेवढ्याच मजबूत खात्याचे मंत्रीपद त्याला दिले जाते. धनंजय मुंडे सुद्धा राष्ट्रवादीमधील मातब्बर नेते आहेत. त्यांनाही मोठे खाते दिले जाईल, अशी अटकळे बांधली जात होती. पण राजकीय वर्तुळात फार लोकप्रिय नसलेले सामाजिक न्याय खाते धनंजय मुंडे यांना दिले आहे. हे खाते देण्यामागे शरद पवार यांचे ‘खास’ डावपेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंतच्या सगळ्याच सरकारांनी राजकीयदृष्ट्या कमकुवत असलेल्या मंत्र्यांकडे सामाजिक न्याय खाते दिले होते. घटनात्मक तरतुदींमुळे या खात्याला जवळपास ५ हजार कोटी रुपयांपर्यंतचा घसघशीत निधी मिळतो. इतका निधी मिळूनही आतापर्यंत सामाजिक न्याय खाते फारशी चमक दाखवू शकलेले नाही. दलित व मागास समाजाची उन्नती करण्याची जबरदस्त क्षमता या खात्यामध्ये आहे. परंतु केवळ मंत्री व अधिकाऱ्यांकडे दुर्दम्य इच्छाशक्ती नसल्यानेच सामाजिक न्याय खाते प्रभाव टाकू शकलेले नाही. या खात्याच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे हित साधता येईल. त्यासाठी खमक्या मंत्र्यांची गरज आहे. ही बाब शरद पवार यांनी हेरली, अन् त्यासाठी धनंजय मुंडे यांची निवड केली.

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

धनंजय मुंडे स्वतः कल्पक, अभ्यासू, कष्टाळू, प्रशासनावर वचक असलेले नेते आहेत. तळागाळातून ते आले आहेत. जनतेच्या समस्या, गाऱ्हाणी त्यांना अचूक ठाऊक आहेत. त्यामुळे ते या खात्यात प्रभावी काम करतील. दलित व मागासवर्गीय समाज गेल्या पाच वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीपासून दुरावला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ने दलित व मागासांना आकर्षित केले आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांच्या वंचितमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला फटका बसला होता, व भाजपला फायदा झाला होता. त्यामुळे या समाजामध्ये पुनश्च स्थान मिळविणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय खाते हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे. या खात्याने चांगली कामगिरी केली तर दलित व मागासवर्गीयांची सहानुभूती मिळेल, असे गणित शरद पवारांनी आखले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असताना जबरदस्त कामगिरी केली होती. सत्ताधारी पक्षाला ते सभागृहात धारेवर धरायचे. तत्कालिन भाजप सरकारच्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर आणले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा मुंडे यांनी प्रभावी काम केले होते. ते लोकप्रिय नेते आहेत, शिवाय त्यांच्याकडे वर्कृत्वशैली सुद्धा आहे. त्यामुळे जिथे जाईल तिथे ते गर्दी खेचतात. लोक त्यांच्या भाषणांना आवर्जून हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर मुंडे यांची सामाजिक न्याय विभागाला ‘ग्लॅमर’ आणतील, अशी खात्री शरद पवारांना आहे. त्यामुळेच त्यांनी मुंडे यांच्याकडे हे खाते सोपविले आहे.

अजित पवारांचाही दलित, मागासवर्गीयांकडे लक्ष

अजित पवार हे लोकप्रिय नेते आहेत. पण दलित, मागासवर्गीयांमध्ये ते फारसे लोकप्रिय नाहीत. पण त्यांनीही आता दलित व मागासवर्गीयांकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. मंत्रीपदावर आल्यानंतर त्यांनी चैत्यभूमीला भेट दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचा सुधारित आराखडा त्यांच्यामुळेच तयार झाला आहे.

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

शदर पवार, धनंजय मुंडे आज डॉ. आंबेडकरांच्या संभाव्य स्मारक स्थळाला भेट देणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्तीर्ण स्मारक बांधण्याचा निर्णय ‘महाविकास आघाडी’ सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार व धनंजय मुंडे आज दुपारी स्मारक स्थळाला भेट देणार आहेत. स्मारकाच्या जागेची ते पाहणी करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी