30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeराजकीयज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर, नरेंद्र मोदींची घेतली भेट

ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर, नरेंद्र मोदींची घेतली भेट

टीम लय भारी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये लवकरच सत्तापालट होईल अशी स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत. कारण काँग्रेसचे तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर आहेत. शिंदे यांनी आज नरेंद्र मोदी व अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत तासभर चर्चाही केली आहे. त्यानंतर शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा व सर्व पदांचा राजीनामा पाठवून दिला आहे. आज सायंकाळी ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे सुमारे 20 आमदार अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याचे दिसत आहे. सध्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसच्या 114, तर भाजपच्या 107 जागा आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या 20 आमदारांकडून आता पाठींबा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करायला संधी मिळू शकेल. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही सत्ताबदल लवकरच होऊ शकेल अशी दाट चिन्हे दिसू लागली आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या मार्गावर, नरेंद्र मोदींची घेतली भेट
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व व सगळ्या पदांचा राजीनामा सोनिया गांधी यांना पाठवला आहे.

विशेष म्हणजे, ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडिल व काँग्रेसचे निष्ठावंत नेते कै. माधवराव शिंदे यांची आज जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोदी – शाह यांची भेट घेतली. शिंदे आज सकाळी नवी दिल्लीतील आपल्या घरातून बाहेर पडले अन् थेट अमित शाहांना भेटले. अमित शाहांसोबत त्यांनी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर शाह व शिंदे हे मोदी यांना भेटायला गेले. या तिघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. शिंदे यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आणायचे, आणि केंद्रात मंत्रीपद द्यायचे. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे अशी रणनिती या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासूनच ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. शिंदे यांना मुख्यमंत्री करून मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करावे अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. पण त्यात कमलनाथ यांनी बाजी मारली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. ग्वाल्हेर येथील गुणा मतदारसंघ हा शिंदे घराण्याचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. पण भाजपच्या झंझावातामुळे शिंदे यांचा आश्चर्यकारक पराभव झाला होता. कमलनाथ व दिग्विजय सिंग गटाकडून ज्योतिरादित्य शिंदे यांचे खच्चीकरण केले जात होते. त्यामुळे शिंदे कमालीचे नाराज होते. त्यांनी आपल्या ट्विटरवरून काँग्रेसचे नाव व पदसुद्धा हटविले होते. तेव्हापासूनच ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात याचे संकेत मिळाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी