28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रगृहमंत्रीपदी जयंत पाटील? चर्चेला उधाण

गृहमंत्रीपदी जयंत पाटील? चर्चेला उधाण

टीम लय भारी

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्याकडून गृहखात्याचा कारभार काढून घेण्यात आला तर या पदासाठी राष्ट्रवादीतून जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याचे बोलले जात होते.

सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील फेरबदलानंतर आता गृहमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

अँटिलिया समोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करून सरकारने विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, केवळ पोलीस अधिकाऱ्यांचाच बळी दिला जात असल्याचा आरोप आता सरकारवर होत आहे. पोलीस दलातही नाराजी आहे. तसेच, अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेतला जावा, असा महाविकास आघाडीमध्येही सूर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत ही यावर खल सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. अनिल देशमुख यांनी ही चर्चा फेटाळली असली तरी कालच्या तातडीच्या भेटीमागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव पुढे आले आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी यापूर्वी अर्थ, संसदीय कामकाज, ग्रामविकास, जलसंपदा अशी अनेक खाती सांभाळली आहे. सध्या मंत्रिपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शरद पवार यांच्याशी पूर्वीपासून एकनिष्ठ असून अजित पवार यांचा ही त्यांच्यावर विश्वास आहे. पक्षाबरोबर महाविकास आघाडीतील इतर सहकाऱ्यांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. त्यामुळे त्यांचे नाव गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी